
छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च (हिं.स.)।
दुबईत युद्धजन्य परिस्थिती असताना या भीतीदायक परिस्थितीतून काँग्रेसचे खासदार कल्याण काळे सहपरिवारासह भारतात परतले आहेत. दुबईसह इतर देशांमध्ये परिस्थिती खराब असून लोकांच्या मनामध्ये भीती असल्याची माहिती खासदारांच्या परिवाराने दिली. युद्धात फसलेले असताना कल्याण काळे दुबईच्या राजाला भेटायला गेले असे टोमणे मारणाऱ्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना धुळवडीमध्ये लोक काहीही बोलतात असे म्हणत प्रत्युत्तर दिले, युद्धजन्य परिस्थितीतून परतलेले काँग्रेस खासदार कल्याण काळे म्हणाले,
आज सकाळी दुबई येथील आपत्कालीन परिस्थितीतून सुखरूप परत येत छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. या वेळी विमानतळावर उपस्थित राहून माझे कार्यकर्ते, हितचिंतक, कुटुंबीय आणि मतदारसंघातील बांधवांनी केलेल्या प्रेमळ स्वागतामुळे मन खरोखरच भारावून गेले.
दुबईमध्ये अडचणीच्या परिस्थितीत असताना माझ्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करणाऱ्या, दुआ करणाऱ्या तसेच सतत फोन करून विचारपूस करणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. विशेषतः भारतीय दूतावासाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार.
आपल्या सर्वांच्या प्रेम, आशीर्वाद आणि प्रार्थनांमुळे मी सुखरूप आपल्या मातीत परतलो आहे. आपल्या या प्रेमाने आणि विश्वासाने मला अधिक ताकद मिळाली आहे. आजपासून पुन्हा नव्या उर्जेने माझ्या मतदारसंघातील जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होत आपल्या सेवेसाठी अधिक जोमाने कामाला लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis