
छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च (हिं.स.) - समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला. यात सीसीटीव्ही बसवण्याचे काम करणाऱ्या कामगारांना भरधाव ट्रकने उडवले. या दुर्घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास जेसीबीच्या बाजूला बसून जेवण करत असताना जेसीबीसह कामगारांना ट्रकने उडवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयपुर शिवारात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या एका अवजड ट्रकने काम करून जेवण करत बसलेल्या 'मेघा इंजिनिअरिंग' कंपनीच्या पाच कामगारांना उडवले. या भीषण अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. समृद्धी महामार्गावरील 406 पॉईंटवर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू होतं. दुपारच्या सुमारास काही कामगार जेसीबीच्या बाजूला बसून जेवण करत होते. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने अचानक जेसीबी आणि तेथील कामगारांना जोरदार धडक दिली. ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, कामगारांना बाजूला जाण्यासाठीही वेळ मिळाला नाही. या भीषण अपघातात दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात गोंधळ उडाला. जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अधित माहिती अशी की, काम संपवून दुपारच्या जेवणासाठी हे कामगार कंपनीच्या सर्विस ट्रक (MH 40 BM 8048) आणि जेसीबी (MH 20 FU 3208) यांच्या मध्ये असलेल्या सावलीत बसले होते. आवश्यक असलेले सेफ्टी बॅरिकेट्स लावूनच हे काम सुरू होते. त्याच वेळी जालन्याच्या दिशेने नागपूरकडे लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने (MH 40 CD 5355) उभे असलेल्या सर्विस ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, सर्विस ट्रक कामगारांना चिरडत पुढे उभे असलेल्या जेसीबीवर आदळला. अपघातग्रस्त ट्रकने ही दोन्ही वाहने तब्बल पावणे दोनशे फूट अंतरापर्यंत फरपटत नेली. या भीषण टकरीत तिघांचा जागीच अंत झाला. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मृतदेह आणि जखमी कामगारांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी