दहशतवादी संघटनांशी संबंध, मुंबईत अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक
मुंबई, ६ मार्च (हिं.स.) : दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी अयान शेख याला अटक केली आहे. एटीएसने २ मार्च रोजी मुंबईतील कुर्ला, गोवंडी आणि शिवाजी नगर परिसरा
अयान शेख एटीएस


मुंबई, ६ मार्च (हिं.स.) : दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी अयान शेख याला अटक केली आहे. एटीएसने २ मार्च रोजी मुंबईतील कुर्ला, गोवंडी आणि शिवाजी नगर परिसरात छापे टाकले होते. हे छापे जैश-ए-मोहम्मद आणि इसिसच्या ऑनलाइन प्रचाराशी संबंधित विशिष्ट माहितीच्या आधारे टाकण्यात आले होते. या छाप्यांनंतर अयान शेखला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली. त्याच्यावर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) ॲक्ट (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान एटीएसने त्याच्या लॅपटॉप आणि मोबाइल फोनसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत, जी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, अयान शेख याने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरशी संबंधित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स शेअर केल्या होत्या आणि त्याने दोन इतर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना (त्याचे जवळचे मित्र) रॅडिकल कंटेंट दाखवून आणि टेलिग्राम ग्रुप्समध्ये जोडून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता. अयान गेल्या ६ महिन्यांपासून मुंबईत ‘जैश-ए-मोहम्मद’चा स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अयानला या देशविघातक कृत्यांसाठी पाकिस्तान आणि सौदी अरेबियातून सतत निधी पुरवला जात होता. हा पैसा ‘क्रिप्टोकरन्सी’च्या माध्यमातून दिला जात असल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्याला आतापर्यंत एकूण किती रक्कम मिळाली, याचा शोध घेण्यासाठी एटीएस त्याचे बँक खाते आणि ‘मनी ट्रेल’ची कसून चौकशी करत आहे.

या प्रकरणात ऑनलाइन रॅडिकलाइझेशन आणि प्रतिबंधित संघटनांच्या प्रचार सामग्रीच्या प्रसाराचा तपास सुरू आहे. एटीएस तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या (१८ ते २३ वयोगटातील) भूमिकेची चौकशी करत आहे, जे सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अतिरेकी कंटेंटशी संबंधित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande