
इस्लामाबाद, 07 मार्च (हिं.स.)। मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता पाकिस्तानातील इंधन दरांवर दिसू लागला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ केली असून प्रति लिटर तब्बल 55 पाकिस्तानी रुपयांनी दर वाढवण्यात आले आहेत. या वाढीनंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर सुमारे 345 रुपयांच्या जवळपास पोहोचली असून डिझेलचा दरही 321 रुपयांच्या पातळीवर गेला आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय दरांमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारच्या मते अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे तसेच मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वेगाने वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम पाकिस्तानसारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर होत असून इंधनाच्या वाढत्या खर्चाचा भार सरकारला दरवाढीच्या स्वरूपात जनतेवर टाकावा लागला आहे. या निर्णयामुळे आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
दरवाढीची बातमी समोर येताच पाकिस्तानातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर अचानक मोठी गर्दी दिसून आली. लाहोर आणि कराचीसारख्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोकांनी पेट्रोल आणि डिझेलचा साठा करून ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही ठिकाणी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. आगामी काळात इंधनाची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी भीती अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान इंधन साठेबाजीच्या अफवांवर पाकिस्तान सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, कोणीही पेट्रोल किंवा डिझेलचा साठा लपवून ठेवत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनीही देशात सध्या पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचे सांगत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
मध्यपूर्वेतील तणाव कधी कमी होईल याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याचे पाकिस्तान सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे भविष्यात पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो, या शक्यतेचा विचार करून सरकार दीर्घकालीन इंधन साठा व्यवस्थापनाची तयारी करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इंधन दरवाढीमुळे पाकिस्तानातील महागाईवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule