
तेहरान, 07 मार्च (हिं.स.) - अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. इस्रायली आणि अमेरिकन सैन्याने इराणी प्रमुख लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे डागली. इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर तसेच इतर ठिकाणी इराणी हल्ले सुरूच आहेत. इराणने आखाती देशांमधील अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त केली आहे. त्यानंतर आज अमेरिकेने इराणला मोठ्या हल्ल्याची धमकी दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने ड्रोन हल्ला करून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर धडक मारली. हा ड्रोन तेहरानमधून डागण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि सोशल मीडियावरील व्हिडीओनुसार, विमानतळावर जोरदार स्फोट झाला आणि त्यानंतर हवेत प्रचंड धूर पसरला. गेल्या आठवड्यातही इराणच्या हल्ल्यात दुबई विमानतळाच्या एका टर्मिनलला नुकसान पोहोचले होते आणि चार कर्मचारी जखमी झाले होते. ही घटना इराणच्या आखाती देशांवरील सतत हल्ल्यांच्या मालिकेचा भाग आहे.
या हल्ल्यानंतर दुबई सरकारने विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत. प्रवासी, कर्मचारी आणि क्रू सदस्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. एमिरेट्स एअरलाइन्सने दुबईला येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे पुढील सूचनेपर्यंत रद्द केली आहेत. २८ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान बुकिंग असलेल्या प्रवाशांना रिफंड किंवा तारीख बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. फ्लाइट रडारच्या माहितीनुसार, इतर विमानांना ६० ते ९० मिनिटांचा विलंब होत आहे.
नंतर दुबई इंटरनॅशनल (DXB) आणि अल मक्तूम (DWC) विमानतळांवरून काही उड्डाणे अंशतः सुरू करण्यात आली. मात्र, एअरलाइन्सकडून प्रवासाची स्पष्ट पुष्टी मिळेपर्यंत प्रवाशांनी विमानतळावर येऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
दुबई मीडिया ऑफिसने सुरुवातीला विमानतळावरील घटनेचे वृत्त फेटाळले होते. त्यांनी सांगितले की, आकाशातून काही अवशेष पडल्यामुळे किरकोळ घटना घडली असून, कोणालाही इजा झालेली नाही. मात्र, नंतर माहिती देण्यात आली की, हवाई संरक्षण यंत्रणांनी रोखलेल्या ड्रोन किंवा क्षेपणास्त्राचे अवशेष जेबेल अली बंदरातील एका धक्क्यावर (berth) पडल्याने तेथे आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यात आली असून, बंदरातील कामकाज सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही घटना अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या वाढत्या तीव्रतेमुळे आखाती देशांवर होणाऱ्या परिणामांचे स्पष्ट उदाहरण आहे. परिस्थिती अस्थिर असल्याने प्रवाशांनी विमानतळ आणि हवाई प्रवासाबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने तीन दिवसांत 5 हजारहून अधिक बॉम्ब टाकले आहेत, ज्यामध्ये इराणमध्ये 1200 हून अधिक लोक मारले गेले आहेत. दरम्यान इस्रायलने तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर हवाई हल्ला केला, ज्यामुळे आग आणि धुराचे लोट पसरले.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, इराणवर सर्वात मोठा हल्ला केला जाईल. या हल्ल्याचा उद्देश इराणच्या क्षेपणास्त्र लाँचर्स आणि क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यांना लक्षणीय नुकसान पोहोचवणे आहे. या कारवाईमुळे इराणची क्षेपणास्त्र क्षमता लक्षणीयरीत्या कमकुवत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी