इमोजी टाइप करताच दिसणार स्टिकर; व्हॉट्सऍपचे आयफोनसाठी नवे फीचर
मुंबई, 07 मार्च (हिं.स.)। लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फिचर्स आणत असते, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव अधिक सोपा आणि मनोरंजक होतो. याच पार्श्वभूमीवर कंपनीने आयफोन वापरकर्त्यांसाठी एक नवे वैशिष्ट्य सादर केले आहे. या
WhatsApp Stickers


मुंबई, 07 मार्च (हिं.स.)। लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फिचर्स आणत असते, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव अधिक सोपा आणि मनोरंजक होतो. याच पार्श्वभूमीवर कंपनीने आयफोन वापरकर्त्यांसाठी एक नवे वैशिष्ट्य सादर केले आहे. या फिचरमुळे चॅट करताना स्टिकर पाठवणे आता अधिक सोपे होणार आहे. व्हॉट्सऍपच्या आयओएस ऍपच्या नव्या अद्ययावत आवृत्तीत असे फिचर जोडले गेले आहे, ज्यामुळे वापरकर्त्याने टाइप केलेल्या इमोजीच्या आधारे संबंधित स्टिकर आपोआप सुचवले जातील.

नव्या फिचरमुळे वापरकर्त्यांना वेगळे स्टिकर कीबोर्ड उघडण्याची किंवा विविध स्टिकर पॅक्समध्ये स्क्रोल करण्याची गरज उरणार नाही. जर एखादा वापरकर्ता चॅट बॉक्समध्ये एखादा इमोजी टाइप करतो, तर त्या इमोजीशी संबंधित स्टिकर त्वरित स्क्रीनवर दिसू लागतील. उदाहरणार्थ, जर हसण्याचा इमोजी टाइप केला तर मजेदार प्रतिक्रिया देणारे स्टिकर दिसतील, तर हृदयाचा इमोजी टाइप केल्यास प्रेम किंवा भावना व्यक्त करणारे स्टिकर समोर येतील. त्यापैकी कोणत्याही स्टिकरवर टॅप करून वापरकर्ता लगेचच ते चॅटमध्ये पाठवू शकतो.

हे नवीन वैशिष्ट्य व्हॉट्सअॅपच्या आयओएस आवृत्ती २६.८.७६ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटा प्लॅटफॉर्म कंपनीकडून हे अद्ययावत हळूहळू आयफोन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. कंपनीच्या माहितीनुसार, येत्या काही आठवड्यांत हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

या फिचरची माहिती सर्वप्रथम WABetaInfo या व्हॉट्सऍप फिचर ट्रॅकरने दिली होती. त्यांच्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅपच्या आधीच्या आयओएस आवृत्ती २६.८.७५ मध्येही या फिचरची चाचणी सुरू होती. मात्र नंतर कंपनीने ते अधिकृतपणे पुढील अद्ययावत आवृत्तीच्या बदलांच्या यादीत समाविष्ट केले. काही वापरकर्त्यांनी ऍप अद्ययावत केल्यानंतर हे फिचर प्रत्यक्ष वापरातही दिसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, व्हॉट्सऍप सध्या आणखी काही नव्या वैशिष्ट्यांवरही काम करत आहे. त्यात समूह संदेश इतिहास हे फिचर विशेष लक्षवेधी आहे. या सुविधेमुळे एखाद्या समूहात नंतर सामील झालेल्या सदस्यांनाही आधीचे संदेश पाहता येणार आहेत. तसेच भारतीय क्रमांकांसाठी सिम जोडणी सुविधा आणि संभाव्य प्रीमियम सदस्यता योजना विकसित करण्याचेही कंपनीचे प्रयत्न सुरू असल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात व्हॉट्सऍपचा वापर अधिक सोयीस्कर आणि विविध सुविधांनी परिपूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande