अमेरिका–इराण युद्धाचा केळी बाजारावर परिणाम; निर्यात ठप्प, शेतकऱ्यांपुढे विक्रीचा प्रश्न
अमरावती, ७ मार्च (हिं.स.) : सध्या बाजारपेठेत केळीला चांगली मागणी असतानाच अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला आहे. आखाती देशांकडे जाणारी निर्यात ठप्प झाल्याने कापणीस तयार झालेल्या केळीची विक्री कुठे करावी
युद्धाचा फटका केळीच्या बागांना निर्यात ठप्प, कापणीला आलेली केळी विकायची कुठे?


अमरावती, ७ मार्च (हिं.स.) : सध्या बाजारपेठेत केळीला चांगली मागणी असतानाच अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला आहे. आखाती देशांकडे जाणारी निर्यात ठप्प झाल्याने कापणीस तयार झालेल्या केळीची विक्री कुठे करावी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचे रूपांतर आता युद्धात झाले आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ इराणपुरता मर्यादित न राहता संपूर्ण अरब देशांवर झाला आहे. सागरी वाहतुकीत अनिश्चितता निर्माण झाल्याने अनेक शिपिंग कंपन्यांनी आखाती देशांकडे माल पाठविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.

सध्या देशांतर्गत बाजारपेठेत केळीला १७०० ते २००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. मात्र निर्यात बंद झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर दबाव वाढत असून दर आधीच अर्ध्यावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. युद्ध अधिक काळ सुरू राहिल्यास निर्यातीसाठी तयार असलेला माल देशांतर्गत बाजारात येण्याची शक्यता असून त्यामुळे केळीच्या दरात आणखी मोठी घसरण होऊ शकते.

दरम्यान, मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असल्याने अरब देशांमध्ये केळीला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर जळगावसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळी निर्यातीसाठी पाठविली होती. मात्र याच काळात निर्यात बंद पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी पाठविलेल्या कंटेनरची रक्कम मिळणेही कठीण झाले असल्याची माहिती केळी व्यापाऱ्यांनी दिली.

यासंदर्भात जगदंबा केला सप्लायर्सचे सचिन मांगूळकर म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातून होणाऱ्या एकूण केळी निर्यातीपैकी सुमारे ६९ टक्के निर्यात ही अरब राष्ट्रांमध्ये होते. त्यामुळे आखाती देशांतील व्यापार ठप्प झाल्याने निर्यातदार व्यापारी आणि शेतकरी दोघेही हवालदिल झाले आहेत.सध्या रमजानमुळे देशांतर्गत बाजारपेठेत केळीची मागणी टिकून आहे. तसेच टरबूज अद्याप मोठ्या प्रमाणात बाजारात आले नसल्याने केळीची मागणी कायम आहे. मात्र युद्धाची परिस्थिती कायम राहिल्यास पुढील आठवड्यात बाजारपेठेतील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande