अमेरिकेसोबत चर्चा अशक्य- अब्बास अराघची
तेहरान, 01 एप्रिल (हिं.स.)।इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारच्या चर्चेची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. दोन्ही देशांमधील विश्वासाचा स्तर शून्यावर आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखती
अमेरिकेसोबत चर्चा अशक्य- अब्बास अराघची


तेहरान, 01 एप्रिल (हिं.स.)।इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारच्या चर्चेची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. दोन्ही देशांमधील विश्वासाचा स्तर शून्यावर आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अराघची यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या कृतींमध्ये तेहरानला कोणतीही प्रामाणिकता दिसत नाही. अमेरिकन सरकारसोबतच्या चर्चेचा अनुभव कधीही सकारात्मक राहिलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

अराघची यांनी सांगितले की, पूर्वी झालेल्या करारांच्या अपयशामुळे आणि अलीकडील शत्रुत्वामुळे राजनैतिक मार्ग जवळपास बंद झाले आहेत. अनेक वर्षांपूर्वी झालेल्या एका कराराची आठवण करून देत त्यांनी आरोप केला की, अमेरिका कोणतेही ठोस कारण नसताना त्या करारातून बाहेर पडली. त्यांनी पुढे म्हटले की, मागील वर्षी आणि यावर्षीही अमेरिकेसोबत चर्चा झाली होती, मात्र त्याचा परिणाम अमेरिकन हल्ल्यांच्या रूपाने समोर आला.

सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लष्करी तयारीबाबतही भाष्य केले. संभाव्य अमेरिकन भू-हल्ल्याला तोंड देण्यासाठी इराणी सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेला इशारा देताना ते म्हणाले की, भू-हल्ला करणे ही अमेरिकेची मोठी चूक ठरेल. “आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. मला वाटत नाही की ते अशी हिंमत करतील. त्यांना सामोरे जाण्यासाठी मोठी ताकद तयार आहे,” असे अराघची म्हणाले.

इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी दावा केला की, अमेरिकन सैन्याला आधीच मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. अमेरिकेची रडार यंत्रणा, विमाने आणि इंधन वाहून नेणाऱ्या टँकरांना हानी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. इराणला स्वतःचे संरक्षण कसे करायचे हे चांगले ठाऊक असल्याचे त्यांनी नमूद केले. भू-युद्धामध्ये इराण आणखी प्रभावी कामगिरी करू शकतो, असा त्यांचा दावा आहे. युद्धाची सुरुवात इराणने केली नसली तरी स्वतःच्या बचावासाठी पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होर्मुज सामुद्रधुनीबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. सध्या हा मार्ग फक्त इराणविरुद्ध युद्ध करणाऱ्यांसाठी बंद असल्याचे त्यांनी सांगितले. हा जलमार्ग इराण आणि ओमान यांच्या समुद्री सीमेत येत असल्याने त्याचे व्यवस्थापन करणे दोन्ही देशांसाठी स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले.

युद्धकाळात शत्रू देशांना व्यापारासाठी समुद्री मार्ग वापरू न देणे ही सामान्य बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मित्र राष्ट्रांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुरक्षा धोक्यांमुळे आणि वाढलेल्या विमा खर्चामुळे काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी हा मार्ग टाळला असला, तरी तेहरान आपल्या मित्र देशांची काळजी घेत असल्याचे त्यांनी म्हटले.

युद्धानंतर या जलमार्गाची स्थिती काय असेल, याचा निर्णय इराण आणि ओमान मिळून घेतील, असेही त्यांनी सांगितले. भविष्यात हा मार्ग पुन्हा शांततापूर्ण आणि सुरक्षित व्यापारासाठी खुला होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सध्या मात्र अमेरिकेवर विश्वास ठेवण्याची किंवा भविष्यातील चर्चेतून सकारात्मक परिणाम होण्याची कोणतीही अपेक्षा नसल्याचे अराघची यांनी पुन्हा अधोरेखित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande