
रायगड, 11 एप्रिल (हिं.स.)अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ऍथलेटिक्स स्पर्धेत सोलापूरमधील विनीत फ्रँकलिन दिनकर याने उत्कृष्ट कामगिरी करत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत देशात पाचवे स्थान पटकावले आहे. त्याने १०.६६ सेकंदांची वेळ नोंदवत ही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामुळे त्याची ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली असून महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.
विनीतच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, नियमित सराव आणि जिद्द यांचा मोठा वाटा आहे. लहानपणापासूनच क्रीडाप्रेमी असलेल्या विनीतने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. आगामी स्पर्धांसाठी तो अधिक शिस्तबद्ध पद्धतीने तयारी करत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा त्याचा मानस आहे.
खेळासोबतच शिक्षणालाही तो तेवढेच महत्त्व देत असून सांगमेश्वर महाविद्यालयात आपला अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. त्याचे वडील फ्रँकलिन दिनकर हे जिओ सर्व्हिसेसमध्ये रायगड जिल्ह्यात एरिया सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे विनीतला प्रोत्साहन मिळाले आहे.
विनीतच्या या यशाबद्दल रायगड जिल्ह्यासह विविध स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. क्रीडाप्रेमी, शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)