
वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा
नाशिक, 10 एप्रिल (हिं.स.)।
नाशिक येथे होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट (इन्व्हिटेशनलीग ) स्पर्धेत,रसिका शिंदेच्या घणाघाती नाबाद १५९ धावांच्या जोरावर नाशिक जिल्हा महिला संघाने लातुरवर २३१ धावांनी मोठा विजय मिळवला. पूजा वाघने ४ बळी घेतले.
एस एस के क्रिकेट मैदानावर झालेल्या या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने ५० षटकांत ५ बाद ३०२ धावा केल्या. रसिका शिंदेने सलामीला खेळत १४२ चेंडूत २० चौकार व एका षटकारासह शेवटपर्यंत नाबाद राहून १५९ धावा फटकावल्या. उत्तरादाखल नाशिकच्या गोलंदाजी समोर लातुरला ३२ षटकांत सर्वबाद ७१ च धावा करता आल्या. पूजा वाघने ४ , वैभवी बालसुब्रमणीयमने २ तर शाल्मली क्षत्रिय व प्रियांका घोडकेने प्रत्येकी १ बळी घेत संघाला २३१ धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
इतर दोन सामन्यात क्रीडक क्रिकेट मैदानावर सांगलीने कर्णधार कृषी ठक्करच्या नाबाद ६१ धावा व ३ बळी या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर १२४ धावा केलेल्या सी डी ए पुणेवर ९ गडी राखून सहज विजय मिळवला. तिला भावी पुनमिया ३ बळी व सरस्वती कोकरे ३ बळी व नाबाद २० धावांची साथ मिळाली व सांगलीने आपला सलग चौथा विजय नोंदवला .
तर मेरी क्रिकेट मैदानावर उस्मानाबाद वि चंद्रोस, पुणे सामन्यात, उस्मानाबादने पायल पवार ६२ , कर्णधार समृद्धी डाले ५१ व मृदुला आचार्यच्या नाबाद ४१ धावांच्या जोरावर २४२ धावा केल्या. चंद्रोसच्या प्रियांका सांगवानने ४ व साईश्री बनसोडेने ३ बळी घेतले. विजयासाठी २४३ धावांचा पाठलाग करताना चंद्रोसच्या शरण्या लांडगे ५९ व गौरी अहिरे ५३ धावा यांचे प्रयत्न दोघीही धावबाद झाल्याने ४० धावांनी कमी पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV