
जम्मू, १२ एप्रिल (हिं.स.)दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहा मंदिराची वार्षिक यात्रा ३ जुलैपासून सुरू होऊन ५७ दिवसांनी २८ ऑगस्ट रोजी संपेल. १३ ते ७० वयोगटातील यात्रेकरू ही यात्रा करू शकतील आणि नोंदणी १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्री अमरनाथजी तीर्थक्षेत्र मंडळाच्या (एसएएसबी) बैठकीत यात्रेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. नायब राज्यपालांनी सांगितले की, यावर्षीची यात्रा थोडी जास्त कालावधीची असून ती अंदाजे ५७ दिवस चालेल. यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून ती १५ एप्रिलपासून सुरू होईल. त्यांनी पुढे सांगितले की, यात्रेकरूंसाठी किमान वय १३ वर्षे आणि कमाल वय ७० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
सिन्हा यांनी सांगितले की, देशभरातील सुमारे ५५६ निश्चित बँक शाखांमार्फत आगाऊ नोंदणी करता येईल, तर श्री अमरनाथजी तीर्थक्षेत्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणीदेखील उपलब्ध असेल. ते म्हणाले की, येस बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ॲक्सिस बँक त्यांच्या शाखांमार्फत नोंदणीची सुविधा देतील. नायब राज्यपालांनी सांगितले की, पहिली पूजा १९ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला केली जाईल. ही यात्रा दोन मार्गांनी सुरू होईल. अनंतनाग जिल्ह्यातील ४८ किलोमीटर लांबीचा पारंपरिक नुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटर लांबीचा छोटा बाल्टाल मार्ग असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे