
नागपूर, 14 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायमूर्ती शरद बोबडे यांची भेट घेतली. यावेळी आंध्रप्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नाझीर देखील उपस्थित होते.
माजी सरन्यायमूर्ती शरद बोबडे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्याचप्रमाणे बोबडे यांना इतिहास आणि वाचनाचा व्यासंग असून वेळोवेळी ऐतिहासीक महत्त्व असलेल्या व्यक्ती व संस्थांची ते माहिती घेत असतात. यापूर्वी शरद बोबडे यांनी सप्टेंबर 2021 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला आणि संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या नागपूरच्या शुक्रवारी परिसरातील पैतृक निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर आज, मंगळवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संध्याकाळी 5 वाजेच्या सुमाराला सिव्हील लाईन्स परिसरातील बोबडे यांच्या निवासस्थानी पोहचलेत. यावेळी दोघांमयध्ये विविध विषयांवर स्नेहपूर्ण संवाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे याप्रसंगी आध्रप्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नाझीर देखील उपस्थित होते. या तिघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. परंतु, नेमके भेटीचे औचित्य काय, हा मुद्दा गुलदस्त्यात असल्यामुळे या भेटीवरून चर्चेला उधाण आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी