संघाला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न, तरी विस्तार होत राहिला - सुहासराव हिरेमठ
कल्याण, 12 एप्रिल (हिं.स.) - गेल्या १०० वर्षात संघाला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण संघाचा विस्तार होत राहिला. चारित्र्यवान समाज निर्मिती आणि त्यासाठी चारित्र्यवान व्यक्ती निर्माण हा संघ कार्याचा गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक स
सुहासराव हिरेमठ


कल्याण, 12 एप्रिल (हिं.स.) - गेल्या १०० वर्षात संघाला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण संघाचा विस्तार होत राहिला. चारित्र्यवान समाज निर्मिती आणि त्यासाठी चारित्र्यवान व्यक्ती निर्माण हा संघ कार्याचा गाभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. संघाचे काम देशाच्या ९८ टक्के जिल्ह्यात, ९० टक्के तालुक्यात आणि सुमारे १ लाख गावांमध्ये प्रतिदिन विविध माध्यमातून सुरु असल्याचे हिरेमठ यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरु आहे. त्याच मालिकेचा एक भाग म्हणून आज संघदृष्टया कल्याण जिल्ह्यातील प्रमुख जनांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कल्याण शहर आणि परिसरातील समाजाच्या विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या १५० नागरिकांनी उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुहासराव हिरेमठ उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतानाच हिरेमठ यांनी पुढील काळात संघ भविष्यातील राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात कश्याप्रकारे समाजातील प्रमुख व्यक्तींचे योगदान आवश्यक आहे याविषयी विवेचन केले. या कार्यक्रमाला संघाचे प्रांत स्तरावरील अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुहासराव हिरेमठ यांची ओळख संघाच्या कल्याण जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भूषण सैदाणे यांनी करुन दिली.

“आपली संस्कृती प्राचीन आहे. परकीय आक्रमणांपूर्वी देशाची ७६ टक्के जनता उच्चशिक्षित होती. वर्णव्यवस्था असली, तरी प्रत्येक वर्णातील शिक्षक त्यांच्या त्यांच्या वर्णात शिक्षणाचा प्रसार करत होते. पण इंग्रजांनी त्यांची सत्ता टिकवण्यासाठी मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीतून समाजाला पाश्चिमात्य संस्कृतीला आपलेसे करण्याचा डाव टाकला. भारताचा एकसंध समाज जातीपाती वाटून तत्कालीन लोकांमध्ये हिनतेची भावना रुजवली आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा आपल्या समाजावर कसा घट्ट होईल याची काळजी घेतली” असेही हिरेमठ यांनी म्हटले. आपल्या समाजावरील हा पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव हटवण्याचे आणि आपल्या संस्कृतीचा अव्हेर कमी करण्याचे काम संघाच्या माध्यमातून करत असल्याची माहितीही हिरेमठ यांनी दिली. पहिल्या सत्र्याच्या उत्तरार्धात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुहासराव हिरेमठ यांनी दिली. सत्राच्या शेवटच्या प्रश्नाला उत्तर देताना सुहासराव हिरेमठ म्हणाले, की “ पुढील ३० वर्ष भारतासाठी स्वर्णिम काळ ठरेल, पण हे समाजातील प्रत्येकाच्या योगदानाशिवाय शक्य नाही. म्हणून इथे उपस्थितांनी देशाला परम वैभव मिळून देण्यासाठी

खारीचा वाटा उचलावा”

दुसऱ्या सत्राची सुरुवात पहिल्या सत्रातील उर्वरित प्रश्नांच्या उत्तरानी झाली. त्यापैकी एका प्रश्नाला उत्तर देताना आपला देश हिंदू राष्ट्र आहेच तो वेगळा घोषित करण्याची गरजच नसल्याचे सुहासराव हिरेमठ यांनी म्हटले. त्यांनी हे विधान पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणेही दिली. त्यापैकी कैफी आझमीनी लिहिलेल्या ए मेरे वतन के लोगों या सुप्रसिद्ध गाण्यातील राम लक्ष्मणाच्या उल्लेखाचेही उदाहरण दिले. त्यावर उपस्थितांनी दाद दिली. प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रात कोकण प्रांतेचे बौद्धिक प्रमुख सुहासजी पोतदार यांनी शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अवलंबलेल्या पंच परिवर्तनाच्या उपक्रमाची माहिती दिली. समाज परिवर्तन आणि नित्य सिद्ध शक्ती तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सुहासजी पोतदार यांनी सांगितले. संघाच्या पंच परिवर्तनात स्व बोध, कुटंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक समरसता या पाच मुद्द्यांचा समावेश आहे. या प्रत्येक मुद्द्यांची विस्तृत मांडणी सुहासजी पोतदार यांनी केली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानताना, सुहासरावजींनी सामाजिक समरसरतेविषयी विवेचन केलेत. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती असतात, ज्यावेळी दुष्ट प्रवृत्ती वर येते त्यावेळी ती व्यक्ती दुष्ट व्यवहार करते, सुष्ट प्रवृत्ती वर आल्यास व्यक्ती सुष्ट व्यवहार करते. संघ प्रत्येक व्यक्तीतील सुष्ट व्यवहार जागृत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आला आहे. यापुढेही करत राहील, समाजातील प्रबुद्ध व्यक्तींनी याच व्यक्तीनिर्माणासाठी वेळेचे योगदान करावे, असे आवाहन करुन हिरेमठ यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande