संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला - शरद पवार
मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) - प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद
शरद पवार आशा भोसले


मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) - प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

00000000

भारतीय संगीत विश्वातील एक अमर स्वर आज शांत झाला - उद्धव ठाकरे

प्रख्यात गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झाले. आज भारतीय संगीताचा एक आधारस्तंभ कोसळला आहे. केवळ त्यांची गाणीच त्यांच्या अमरत्वाची साक्ष म्हणून कायम राहतील. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले, भारतीय संगीत विश्वातील एक अमर स्वर आज शांत झाला आहे. त्यांच्या सुमधुर सुरांनी असंख्य पिढ्यांना आनंद दिला आणि मानवी भावनांच्या गाभाऱ्याला स्पर्श केला. त्या एक अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय व्यक्तिमत्त्व होत्या; लता दीदींच्या पावलावर पाऊल टाकत, संगीत क्षेत्रातील एका गौरवशाली पर्वाला समर्थपणे पेलणारा एक भक्कम आधारस्तंभ म्हणून त्या उभ्या राहिल्या.

000000000

जगण्यातील श्रीमंती गमावली ! - आशिष शेलार

माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली...

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande