
नवी दिल्ली, १२ एप्रिल (हिं.स.)जनता दल युनायटेडचे (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर बिहारमधील मुख्यमंत्रीपदाची शर्यत तीव्र झाली आहे. रविवारी, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय मंडळाने केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची बिहारमधील पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात नवीन नेत्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
पक्षाच्या संसदीय मंडळाने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची बिहारमधील पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा अनुभव आणि सर्वांसोबत काम करण्याच्या क्षमतेमुळे पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ते लवकरच पाटणा येथे दाखल होतील आणि भाजप विधिमंडळ पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. आज मुख्यमंत्री निवासस्थानी भाजप आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली, त्यानंतर ते सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे