
मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.) : भारतीय संगीत जगतातील अजरामर आवाजाच्या मल्लिका, स्वरमंजिरी आशा भोसले यांचे निधन झाले. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात आज, रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या 92 वर्षांच्या होत्या.
आशा भोसले यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सातत्याने खालावत जाऊन त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसलेंचे सुपुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या निधनाला दुजोरा दिला. भोसले कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील लोअर परेल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे आनंद भोसले यांनी सांगितले.
अद्वितीय कारकीर्द आणि अमर ठसा
आशा भोसले या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी एक होत्या. “देखो जी चांद निकला पिछे खजुर के, बसरे कि हुर नाचे आगे हुजूर के” या 1950 च्या दशकातील पहिल्या चित्रपट गीतापासून सुरू झालेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपला आवाज दिला. संगीतकार ओ.पी. नय्यर आणि आर.डी. बर्मन यांच्यासोबतची जोडी विशेष गाजली. त्यांनी क्लासिकल, गझल, पॉप, कॅबरे आणि रोमँटिक गाण्यांमध्येही आपली वेगळी छाप सोडली.‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’ यांसारखी त्यांची अजरामर गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.
सन्मान आणि गौरव
आशाताईंच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्म विभूषणप्रदान करण्यात आला होता. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील अफाट योगदानामुळे आशा भोसले या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून सदैव स्मरणात राहतील.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी