
लखनौ, 12 एप्रिल (हिं.स.)। पंजाबमधील श्रद्धाळूंची वृंदावन येथे यमुना नदीत उलटलेल्या मोटरबोटीतील आणखी दोन जणांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत. या अपघातात मृतांची संख्या आता १३ झाली आहे. अजून तीन जणांचा शोध सुरू आहे.
पंजाबमधील श्रद्धाळूंची मोटरबोट यमुना नदीत उलटल्यानंतर बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी बचाव पथकाने रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. आज सकाळी एका महिलेसह दोन श्रद्धाळूंचे मृतदेह सापडले. याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक सुरेश चंद्र रावत यांनी सांगितले की, सकाळी प्रथम यमुना नदीतून एका युवकाचा मृतदेह सापडला. त्याची ओळख लुधियाना येथील जगरावचा रहिवासी ऋषभ शर्मा अशी झाली आहे. त्याचा मृतदेह अक्रूर घाटाजवळ सापडला. त्यानंतर बचाव पथकाने देवरहा बाबा घाटाजवळ एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला. त्या महिलेची ओळख लुधियाना येथील अर्बन इस्टेट दुगरी येथील २१ वर्षीय डिंकी बंसल अशी झाली आहे. या अपघातात डिंकी बंसलची आई मीनू बंसल यांचाही मृत्यू झाला असून, त्यांचा मृतदेह शुक्रवारीच बाहेर काढण्यात आला होता. त्यांनी सांगितले की, पंकज मल्होत्रा, यश भल्ला आणि मोनिका हे अजून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, मृतदेह पाण्यात फुगून वर आले होते, ज्यांना दोरीच्या साहाय्याने बोटीत ओढून बाहेर काढण्यात आले. नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचून त्यांची ओळख पटवली. मृत डिंकी बीए अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. तर ऋषभ शर्मा १२वी उत्तीर्ण होता आणि वडिलांच्या कामात मदत करत होता. शनिवारी मानिक टंडन यांचा मृतदेह देवरहा बाबा घाटाजवळ सापडला होता। यानंतर मृतांची संख्या १३ वर पोहोचली आहे.
डीएम सीपी सिंह यांनी सांगितले की, एडीएम पंकज वर्मा यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे अपघातातील सर्व दोषींवर कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही. सध्या पोलिसांनी चालक आणि ठेकेदार यांना प्राथमिक चौकशीत दोषी मानून तुरुंगात पाठवले आहे.
प्रत्यक्षात शुक्रवारी यमुना नदीत पाँटून पुलाच्या पीपाला धडक लागल्यानंतर पंजाबमधील श्रद्धाळूंची एक मोटरबोट नदीच्या मधोमध उलटली होती. त्याच दिवशी चालवलेल्या बचाव मोहिमेत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत आणखी एक मृतदेह सापडला होता. अजून तीन जणांचा शोध सुरू आहे.
सात सेक्टरमध्ये शोधमोहीम सुरू
पंजाबमधून आप्तेष्टांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक वृंदावन येथे पोहोचले आहेत. प्रशासन, स्थानिक पोलीस तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांकडून बेपत्ता श्रद्धाळूंचा शोध घेतला जात आहे. यमुनेचा वेगवान प्रवाह आणि खोल घाट यामुळे बचावकार्यांत अडचणी येत आहेत. बचाव पथकांनी केसी घाट ते गोकुल बॅरेजपर्यंत यमुना नदीला सात भागांत विभागले आहे. सुमारे २० किलोमीटर परिसरात बुडालेल्यांचा शोध घेतला जात आहे. डीआयजी आग्रा रेंज यांच्या आदेशानुसार सर्व सात सेक्टरमध्ये पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. स्थानिक गोताखोर, नाविक, पीएसी गोताखोर, एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके या शोधमोहीमेत सहभागी आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule