
नागपूर, 12 एप्रिल (हिं.स.)आशा भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोकाची लाट पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनीही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आशाताईंना श्रद्धांजली वाहत म्हटले आहे की, सुप्रसिद्ध गायिका पद्म विभूषण आशा ताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. त्यांच्याशी माझे कौटुंबिक ऋणानुबंध होते. माझ्या 61व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला त्या आवर्जून उपस्थित होत्या आणि गाणं गाऊन मला आशीर्वाद दिले होते. आता देखील अगदी तीन महिन्यांपूर्वी माझी त्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्या थकलेल्या जाणवल्या आणि आज त्यांच्या निधनाची बातमी कळली. संगीत क्षेत्रात लता दीदींनी जसे जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे केले, तीच किमया आशा ताईंनी सुद्धा साधली. विदर्भाशी त्यांचे विशेष नाते होते. कविवर्य सुरेश भट यांच्या 'केव्हा तरी पहाटे' सारख्या अनेक गझला त्यांनी गायल्या आणि अजरामर केल्या. आशा ताईंनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली. पुढची अनेक वर्षे त्यांची गीते भारतीय रसिकांच्या मनात घर करून राहणार आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीतविश्वावर आणि भारतातील समस्त संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात आघात झाला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना परमेश्वराने द्यावी, अशी प्रार्थना करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे