आयएमडीकडून मान्सून २०२६चा पहिला अंदाज जाहीर; सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.)। भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी आज नैऋत्य मान्सून २०२६चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला असून यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पर्जन्य होण्याची शक्यता वर्तवली आहे. हा अंदाज सामान्यपेक्षा कमी पावसाच्या श्रेणीत मोडत
IMD


नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.)। भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी आज नैऋत्य मान्सून २०२६चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला असून यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पर्जन्य होण्याची शक्यता वर्तवली आहे. हा अंदाज सामान्यपेक्षा कमी पावसाच्या श्रेणीत मोडत असल्यामुळे शेतकरी आणि अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब मानली जात आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी हा अंदाज जाहीर केला.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत पावसाची स्थिती तुलनेने सामान्य राहण्याची शक्यता आहे. मात्र जुलै ते सप्टेंबर या कालावधीत एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तरीही भारतीय महासागरातील सकारात्मक परिस्थितीमुळे एल निनोचा नकारात्मक परिणाम कमी प्रमाणात जाणवेल, असेही डॉ. मोहापात्रा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मान्सून पूर्णपणे कमजोर न राहता काही प्रमाणात संतुलित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाचे मोजमाप करताना आयएमडीने ठरवलेल्या निकषांनुसार, सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस अपुरा मानला जातो, तर ९० ते ९५ टक्के पाऊस हा सामान्यपेक्षा कमी समजला जातो. ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सामान्य श्रेणीत येतो, तर १०५ ते ११० टक्के पाऊस सरासरीपेक्षा अधिक आणि ११० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस हा अतिवृष्टीच्या श्रेणीत मोडतो. यावर्षीचा ९२ टक्क्यांचा अंदाज हा कमी पावसाच्या गटात असल्यामुळे शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

याआधी काही खाजगी वेधशाळांनीही मान्सून कमकुवत राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा काय अंदाज जाहीर करते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर आयएमडीच्या या पहिल्या अधिकृत अंदाजानंतर बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून पुढील काही महिन्यांतील हवामानातील बदलांवर देशाचे लक्ष राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande