प. बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यास गुंडगिरी संपुष्टात येईल - अमित शाह
कोलकाता, 13 एप्रिल (हिं.स.)। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथे झालेल्या जनसभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली.
WB AMIT SHAH RALLY BIRBHUM


कोलकाता, 13 एप्रिल (हिं.स.)। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथे झालेल्या जनसभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. राज्यात “गुंडाराज” सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, चार मे नंतर भाजप सत्तेत आल्यास गुंडांना शोधून शोधून जेलमध्ये टाकले जाईल आणि कायद्याचा धाक प्रस्थापित केला जाईल.

सभेदरम्यान त्यांनी २०२१ च्या निवडणुकांनंतर भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या कथित अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करत जनतेला बदलासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. २३ एप्रिल रोजी मतदान करताना भीती न बाळगता विश्वासाने मतदान करा आणि “बॉम्बला बॅलेटने उत्तर द्या,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. तसेच त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना इशारा देत म्हटले की, मतदानाच्या दिवशी घरात राहा, अन्यथा पाच मे नंतर कारवाईला सामोरे जावे लागेल.

“डबल इंजिन सरकार”चा उल्लेख करत त्यांनी दावा केला की भाजप सत्तेत आल्यास राज्यात विकासाला गती मिळेल. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटले की महिला मुख्यमंत्री असूनही राज्यात महिलांची सुरक्षा सुनिश्चित झालेली नाही. भाजप सरकार आल्यास महिलांना रात्रीसुद्धा सुरक्षितपणे बाहेर पडता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी शिक्षक भरती, रेशन, मनरेगा आणि गृहनिर्माण योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. केंद्र सरकारच्या योजनांचा पैसा सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. घुसखोरीच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की तृणमूल सरकार हे थांबवण्यात अपयशी ठरले असून भाजप सत्तेत आल्यास घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

याशिवाय समान नागरी संहिता म्हणजेच यूसीसी लागू करण्याचे आश्वासनही त्यांनी पुन्हा दिले आणि बहुपत्नीत्वासारख्या प्रथांवर बंदी घातली जाईल असे सांगितले. सभेच्या सुरुवातीला त्यांनी मंचावरील सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचे निर्देश देत लोकांना कार्यक्रमस्थळी मुक्त प्रवेश देण्याचेही सांगितले.

बोलपूर येथील सभेनंतर त्यांचे खैराशोल आणि पश्चिम बर्धमान येथेही सभा आणि रोड शो आयोजित करण्यात आले आहेत. बीरभूम हा भाग तृणमूलचे नेते अनुव्रत मंडल यांचा बालेकिल्ला मानला जातो. ते जनावरांच्या तस्करी प्रकरणात दीर्घकाळ तिहार जेलमध्ये होते आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळेही चर्चेत राहिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande