छत्तीसगड : वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोट; 9 कामगारांचा मृत्यू
बिलासपूर, 14 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडच्या सिंघीतराई येथील वेदांता पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी झालेल्या भीषण बॉयलर स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 30हून अधिक कामगार जखमी झालेत. अचानक झालेल्या या स्फोटानंतर प्लांटमध्ये आग व धुराचे लोट पसरले. त्यामु
छत्तीसगडच्या वेदांता प्लांटमधील ब्लास्टचे छायाचित्र


बिलासपूर, 14 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडच्या सिंघीतराई येथील वेदांता पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी झालेल्या भीषण बॉयलर स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 30हून अधिक कामगार जखमी झालेत. अचानक झालेल्या या स्फोटानंतर प्लांटमध्ये आग व धुराचे लोट पसरले. त्यामुळे तेथील कामगारांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी प्लांटमध्ये मोठ्या संख्येने कामगार कार्यरत होते. सुमारे 30पेक्षा अधिक कामगार जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोटानंतर प्लांटमध्ये भगदडीची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक कामगार भाजले गेले असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत.बचाव पथकांनी जखमींना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात हलवले आहे. प्रशासनाने घटनास्थळाभोवती सुरक्षा घेरा घालून तपास सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक प्रफुल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयलरच्या ट्यूब फुटल्यामुळे हा स्फोट झाला. आतापर्यंत 9 कामगारांच्या मृत्यूला दुजोरा मिळाला असून 30 हून अधिक कामगार गंभीर जखमी आहेत. काही कामगार अजूनही प्लांट परिसरात अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार बॉयलर फुटणे हे कारण असल्याचे सांगितले जात आहे, मात्र सखोल तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.या दुर्घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा मानकांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक व कामगार संघटनांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. दरम्यान मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या घटनेला अत्यंत वेदनादायक व हृदयद्रावक असल्याचे सांगत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande