
नवी दिल्ली, 14 एप्रिल (हिं.स.)। टपाल विभागाने प्रधानमंत्री संग्रहालयाच्या सहकार्याने 'एक भारत, श्रेष्ठ भारत: टपाल तिकिटांद्वारे भारताची एकता आणि लोकशाहीचा उत्सव' या शीर्षकाचे टपाल तिकीट प्रदर्शन 14 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दळणवळण मंत्री आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली. आपल्या भेटीदरम्यान त्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेले टपाल तिकीट संग्राहक आणि अभिकल्पकार यांच्याशी संवाद साधला, आणि भारताच्या समृद्ध टपाल वारशाच्या जतन व प्रसारासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
या प्रदर्शनात भारताची सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि टपाल परंपरा दर्शवणाऱ्या टपाल तिकिटांचा निवडक संग्रह सादर करण्यात आला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि स्वातंत्र्यसैनिक या विषयांवरील विशेष मांडणीमुळे हे प्रदर्शन पाहणाऱ्यांसाठी आकर्षक आणि समृद्ध करणारा अनुभव ठरतो.ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी प्रधानमंत्री संग्रहालयात टपाल तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन करून त्याचा आढावा घेतला.
या प्रसंगी बोलताना सिंधिया म्हणाले की हा दिवस टपाल विभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रधानमंत्री संग्रहालयाच्या चमूच्या सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. स्वातंत्र्याच्या काळापासून अमृत काल आणि पुढे शताब्दी कालापर्यंत भारताच्या प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की टपाल विभागाने इतिहासात जशी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तशीच भूमिका पुढेही राष्ट्रनिर्मितीत बजावत राहील. टपाल विभाग आणि प्रधानमंत्री संग्रहालय देशभरात टपाल तिकीट प्रदर्शनांचे आयोजन करण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक बळकट करतील, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या प्रसंगी चित्रमय टपाल पत्राचे प्रकाशन
या प्रसंगी प्रधानमंत्री संग्रहालयाच्या चौथ्या स्थापना दिनानिमित्त, 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि भारतीय राज्यघटनेच्या स्मरणार्थ अशा तीन वेगवेगळ्या चित्रमय टपाल पत्र संचांचे प्रकाशन करण्यात आले.
प्रधानमंत्री संग्रहालय आणि टपाल विभागाात सामंजस्य करार
भारताच्या सांस्कृतिक आणि टपाल वारशाच्या प्रसारासाठी प्रदर्शन, जनजागृती कार्यक्रम आणि संयुक्त ब्रॅंड- चिन्हांकित टपाल उत्पादनांद्वारे सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी टपाल विभाग आणि संग्रहालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या भागीदारीत संग्रहालयात भारत टपालचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचाही विचार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाने सांस्कृतिक संस्था आणि टपाल वारसा यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.संग्रहालयाच्या भेटीदरम्यान ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी प्रधानमंत्री संग्रहालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विशेष प्रदर्शनालाही भेट दिली. येथे त्यांनी पंतप्रधानांच्या जीवनप्रवास, नेतृत्व आणि प्रमुख उपक्रमांवर आधारित प्रदर्शने पाहिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule