
चेन्नई, 14 एप्रिल (हिं.स.)भाजपने तामिळनाडू निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये महिलांना दरमहा 2,000 आणि वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपने प्रत्येक गरीब कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा 2,000, वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलिंडर आणि वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 10,000 चे एकरकमी अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांना ई-स्कूटर खरेदी करण्यासाठी 25,000 चे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. जल्लीकट्टू बैल हाताळणाऱ्यांसाठी दरमहा 2,000 ची मदत आणि सहभागीच्या मृत्यूप्रकरणी 10 लाखांची भरपाई प्रस्तावित आहे.
भाजपने सत्तेवर आल्यास तामिळनाडूमध्ये प्रथमच घर खरेदी करणाऱ्या महिलांना मुद्रांक शुल्कात 3% सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. घरगुती वस्तूंवर ८,००० किमतीचे कूपन यांसारख्या भेटवस्तूंचीही घोषणा केली आहे. पक्षाने प्रमुख मंदिरांमध्ये स्थानिकांसाठी दररोज दोन तासांच्या दर्शनाची वेळ जाहीर केली आहे. तिरुप्परनकुंद्रम टेकडीवर दिवे लावण्यासह कार्तिक दीपम विधी सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. नड्डा यांनी आरोप केला की, तामिळनाडूमध्ये अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे ५१ टक्क्यांनी वाढले आहेत. भाजपने डीएमकेवर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा आरोप करत त्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले आहेत.
भाजपने पोलीस यंत्रणा मजबूत करण्यासाठी उपाययोजनांची घोषणा केली आहे, ज्यात शून्य एफआयआर, गंभीर गुन्ह्यांसाठी त्वरित न्यायालयीन कार्यवाही आणि सुरक्षेसाठी बस, शाळा व विद्यापीठांमध्ये १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यांचा समावेश आहे. भाजप तामिळनाडू विधानसभा निवडणूक एआयएडीएमकेसोबत युती करून लढवत आहे. डीएमके राज्यात १० वर्षांपासून सत्तेत आहे आणि विरोधी आघाडीसमोर त्यांना हॅट-ट्रिक करण्यापासून रोखण्याचे आव्हान आहे.तामिळ नववर्षाच्या निमित्ताने जाहीरनामा प्रसिद्ध करताना नड्डा यांनी नमूद केले की, आज बी. आर. आंबेडकर यांची १५० वी जयंती देखील आहे. तामिळनाडू हे जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीचे उगमस्थान देखील आहे. पक्षाने तिरुवल्लुवर आणि सुब्रमण्य भारती यांसारख्या व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख करून आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमानही व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे