
अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.)। स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात १२ वर्षीय बालरुग्णावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, अमरावती शहरात इतक्या लहान वयाच्या रुग्णावर करण्यात आलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.
बारीपुरा जुनी वस्ती येथील अनंत मधुकर लांडोरे यांचा मुलगा सिद्धेश अनंत लांडोरे हा जन्मतः एकाच किडनीसह जन्माला आला होता. मात्र ती किडनीही नीट कार्यरत नसल्यामुळे त्याला दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे व वारंवार ताप येणे अशा समस्या उद्भवत होत्या. यासाठी त्याच्यावर नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. प्रकृती खालावत असल्याने किडनी प्रत्यारोपण हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सुचवले. त्यानुसार अवघ्या तीन आठवड्यांत आवश्यक वैद्यकीय तपासण्या, कागदपत्रे, कायदेशीर प्रक्रिया व पोलिस पडताळणी पूर्ण करून प्रकरणाला प्राधिकरण समितीची मान्यता मिळवण्यात आली.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन टेकाडे व डॉ. सोमेश्वर निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ. ओम गवई, डॉ. अविनाश चौधरी, डॉ. नयन काकडे तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. सुमारे पाच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत वडिलांनीच मुलाला किडनी दान देऊन जीवनदान दिले. ही खर्चिक शस्त्रक्रिया शासनाच्या ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वीच्या अनेक तपासण्या देखील रुग्णालयाने मोफत केल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत वैद्यकीय पथकाचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी