परतवाडा प्रकरणात ४ आरोपी अटकेत, एसआयटी स्थापन
अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) : परतवाडा पोलीस ठाणे हद्दीत सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अयान अहमद तनविर अहमद (वय १९, रा. परतवाडा) याच्याविरुद
परतवाडा प्रकरणात ४ आरोपी अटकेत; १८ व्हिडिओ व ३९ फोटो जप्त, SIT कडून सखोल तपास सुरू सर्व आरोपींना २१ पर्यंत पोलिस कोठड़ी


अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) : परतवाडा पोलीस ठाणे हद्दीत सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणात अयान अहमद तनविर अहमद (वय १९, रा. परतवाडा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९४, पोस्को कायदा कलम ८ व १२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ व ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान आरोपी अयानच्या मोबाईलमधून ८ पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो आढळून आले. हे व्हिडिओ त्याने उजेर खान (रा. अचलपूर) याला पाठवल्याचे उघड झाले. त्यानंतर उजेर खानने हे व्हिडिओ मो. साद मो. साबीर आणि तरबेज खान तसलीम खान यांना व्हॉट्सऍपवरून शेअर केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

सर्व आरोपींचे पाच मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक शुभमकुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून १० अधिकारी आणि ३६ कर्मचारी तपासात गुंतले आहेत.तसेच, पीडित मुलींनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande