
अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) : गेल्या काही वर्षांत अमरावती जिल्ह्यातील रस्त्यांवर वन्यप्राण्यांचे अपघात वाढत असून ही चिंताजनक बाब ठरत आहे. वाढती वाहतूक, रस्त्यांचे विस्तारलेले जाळे आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे तुकडीकरण यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. बिबट्या, चितळ, काळवीट, नीलगाय यांसारख्या अनुसूची एकमधील महत्त्वाच्या प्रजातींचा या अपघातांत मृत्यू होत असल्याने जैवविविधतेवरही परिणाम होत आहे.
हे अपघात प्रामुख्याने वन्यजीव कॉरिडॉरमध्ये घडतात. हे कॉरिडॉर म्हणजे प्राण्यांच्या स्थलांतरासाठी आणि मुक्त हालचालींसाठी अत्यंत आवश्यक पर्यावरणीय मार्ग आहेत. या मार्गांवरून वेगाने धावणारी वाहने प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात अडथळा निर्माण करतात आणि अपघातांची शक्यता वाढवतात.
या समस्येवर उपाय म्हणून ‘बीगकॅट कन्झर्व्हेशन ट्रस्ट इंडिया’ आणि ‘वाइल्ड लाइफ रिसोर्स फाउंडेशन’ यांनी वैज्ञानिक व जनजागृतीवर आधारित उपक्रम सुरू केला आहे.
या मोहिमेंतर्गत अपघातप्रवण ठिकाणी रस्त्यांवर आकर्षक वन्यजीवांची चित्रकला केली जात आहे. व्यवहारशास्त्र आणि दृश्य ग्रहणशक्तीचा वापर करून तयार केलेली ही चित्रे वाहनचालकांचे लक्ष वेधून घेतात, त्यांची जागरूकता वाढवतात आणि त्यामुळे वाहनांचा वेग आपोआप कमी होतो.
‘रोड इकॉलॉजी’ अभ्यासानुसार अशा प्रकारचे दृश्य हस्तक्षेप अपघात कमी करण्यात प्रभावी ठरतात. या उपक्रमांतर्गत स्वयंसेवक दररोज रात्री संबंधित ठिकाणांचे निरीक्षण, नकाशीकरण आणि प्रत्यक्ष चित्रकलेचे काम करतात. कमी खर्चात प्रभावी ठरणारा हा उपक्रम वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्थानिक सहभाग यांचा उत्तम संगम मानला जात आहे.
या मोहिमेला स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, रस्ते सुरक्षिततेबरोबरच पर्यावरण संवर्धनाबाबतही जागरूकता वाढत असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.
या उपक्रमात कुणाल दातेराव, बबलू बोबडे, अमीन गुडे, जिया बुगदादी, सुमेध गवई, अमित मोटीवाला, मेहुल रायचंद, नरेश पाठाडे, आकाश हरले, प्रसाद वानखेडे आदींचा सक्रिय सहभाग आहे.
दरम्यान, अशा प्रकारचे उपक्रम वनविभागाकडूनही अनेक वर्षांपासून राबविले जात आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी डॉ. मयूर बैलुमे यांनी सांगितले की, “वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी या उपाययोजना प्रभावी ठरत असून, वन्यजीव प्रेमींचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.”
मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करून सहअस्तित्व निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी