
जळगाव, 15 एप्रिल, (हिं.स.) शहरातील एटीएम फोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव पोलिसांना यश आले असून दोघांना अटक केली आहे. या आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांसह ATM चोरी केल्याची कबुली दिली असून, चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि अन्य मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शहरातील पोलन पेठ परिसरातील सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्स येथील इक्वीटस स्मॉल बँकेचे ATM मशीन चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ३ एप्रिल २०२६ रोजी बँकेचे व्यवसाय ब्रँच मॅनेजर हरीष विजय गांधी (वय ३७) यांनी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संबंधित आरोपी पुन्हा ATM चोरी करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मन्यारखेडा रोडवर सापळा रचून पोलिसांनी मोबीन आत्मज मिला (वय २८ वर्ष रा. बेगी नाजर, ता. नकुर जि. सहानपुर, उत्तर प्रदेश) व अब्दुल करीम नुर हसन (वय ५२ वर्ष रा. तितरोद ता. नकुर जि. सहानपुर उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल, १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन, ७०० रुपये रोख रक्कम आणि दोन हेल्मेट असा एकूण ६१,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी त्यांच्या इतर तीन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, ATM चोरी करण्यासाठी शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून महिंद्रा पिकअप गाडी चोरी करून तिचा वापर केल्याचेही त्यांनी सांगितले. या आरोपींनी यापूर्वी महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्येही ATM चोरीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर