
बीड, 17 एप्रिल (हिं.स.)।गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन मणीमंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची घटना केज येथील बसस्थानकात घडली. संबंधित महिलेने गळ्याला हात लावलेल्या संशयित महिलेस धरून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
उत्तरेश्वर पिंप्री (ता.केज) येथील कामानिमित्त केजला आल्या होत्या. परत गावाकडे जाण्यासाठी नांदूरघाट बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किंमतीचे ७ ग्रॅमचे दोन मणीमंगळसूत्र चोरी केले. याचवेळी त्यांच्या पाठीमागून गळ्याला हात लावून मणीमंगळसूत्र चोरत असल्याचा संशय आल्याने त्यांनी लगेच हात पकडला.
दोन ते तीन वर्षाचे मूल कडेला घेऊन असलेल्या महिलेस पकडून तिच्याकडे चोरीला गेलेल्या मणीमंगळसूत्रची मागणी केली. मात्र तिने परत न केल्याने बसस्थानकावर ड्युटीस असलेले होमगार्ड प्रकाश मस्के यांनी महिला होमगार्ड काकडे व गव्हाणे यांना बोलवून या महिलेस ताब्यात दिले. फिर्यादीवरून संशयित महिलेविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार राजू वाघमारे हे तपास करताहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis