
अकोला, 15 एप्रिल (हिं.स.)। अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.. याप्रकरणी आता सासरच्या सात जणांविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील जुने शहर परिसरातील भावना घाटोळे या विवाहित महिलेने काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पाच वर्षांपूर्वी भावना यांचा विवाह विशाल घाटोळे यांच्यासोबत झाला होता. त्यांना 14 महिन्यांचं बाळ आहे. दरम्यान लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सतत हुंड्यासाठी टोमणे, मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला होता. “आम्ही श्रीमंत आहोत, तुमच्याकडून काहीच मिळालं नाही,” अशा शब्दांत भावनाला वारंवार अपमानित केलं जात होतं, असा आरोपही तिच्या वडिलांनी केला होता.. घटनेच्या दिवशी सकाळच्या दरम्यान भावनाने वडिलांना फोन करून “मला इथून घेऊन चला, मला खूप त्रास देतात,” अशी आर्त विनंती केली होती. मात्र काही तासांतच जावयाचा फोन आला आणि आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर भावनाचे वडील विठ्ठल मलवळकर यांनी गंभीर आरोप केले होते.. महिलेच्या शव विच्छेदन अहवालानंतर आज पोलिसांनी सासरकडील सात जणांवर आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत..सासरच्या छळामुळे महिलांच्या आत्महत्यांचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विवाहितेच्या माहेर कडील मंडळींनी केली आहे.अकोल्यातील या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा आणि हुंडाबळींचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे