
लातूर, 15 एप्रिल, (हिं.स.) - अहमदपूर येथील नांदेड रोडवरील व्यंकटेश्वरा इलेक्ट्रिकल्स हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सलगरा येथील रहिवासी बळवंत वैजनाथ मोरे यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी बळवंत मोरे यांचे नांदेड रोडवर इलेक्ट्रिक मोटार दुरुस्तीचे दुकान असून, ते दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता त्यांचा मुलगा जनक मोरे हा दुकान उघडण्यासाठी गेला असता त्याला दुकानात चोरी झाल्याचे समजले. अज्ञात चोरट्याने दुकानावरील लोखंडी पत्रे काढून आत प्रवेश केला आणि मागील बाजूचे शटर आतून उघडून ९० हजार रुपये किमतीचे गन मेटल बुशचे चार नवीन बॉक्स आणि ३० हजार रुपये किमतीचे ३० किलो भंगार बुश असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा माल चोरून नेला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis