
अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.)। अंजनगावबारी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सातत्याने होत आहे. दरम्यान, दिवसा मात्र तीन फेजचा पुरवठा सुरू ठेवून ओलितासाठी सक्तीची वेळ लादली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. उष्णतेची तीव्रता वाढलेली असताना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचा कालावधीच सर्वांत सोयीचा ठरतो, मात्र रात्री फेज बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मध्यरात्रीपर्यंत जागून त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण अधिकाऱ्यांचा मनमानी आणि ढिसाळ कारभार यामागे कारणीभूत असून शेतकऱ्यांची कोणीही दखल घेत नाही.
वीजपुरवठा वेळापत्रकासाठी पूर्वसूचनाही दिली जात नाही तसेच कनिष्ठ अभियंता किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. रात्री सिंगल फेज बंद केल्यामुळे विद्युतपंप सुरू न झाल्याने पिकांच्या ओलितावर परिणाम होत आहे. सध्या उभ्या पिकांना पाणी देणे ही सर्वांत मोठी गरज असून विजेअभावी खत देणे, फवारणी करणे अशा कृषी कामांवरही परिणाम होत आहे. दिवसा तीन फेज मिळाले, तरी प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढत असल्याने पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी या समस्येबाबत अनेक वेळा महावितरणकडे तक्रारी केल्या असल्या तरी कोणतीही ठोस दखल न घेतल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर क्षमतेपेक्षा जास्त लोड, देखभाल दुरुस्तीअभावी लाइन ट्रिप तसेच ग्रामीण भागातील दुर्लक्ष, हीच या समस्यांची मुख्य कारणे असल्याचेही शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांनी तातडीने रात्रीचा सिंगल फेज सुरू करून नियमित व निर्बंधविरहित वीजपुरवठा द्यावा तसेच दिवस-रात्र तीन-फेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
रात्री वीज बंद, अर्थिंगचा बहाणा
अंजनगावबारी येथे रात्रीची सिंगल फेज लाइन सतत बंद ठेवण्यामागे अर्थिंगसाठी पाण्याची सोय नसणे, असे कारण महावितरणकडून दिले जात असून शेतकरी त्याला निव्वळ बहाणा ठरवत आहेत. तांत्रिक त्रुटींवर अधिकाऱ्यांची चुप्पी कायम असताना सेवा विस्कळीत असूनही बिले काढत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून होत आहे. विजेचा पुरवठा शून्य, पण वसुलीत काटेकोरपणा, या विरोधाभासामुळे शेतकरी संतप्त आहेत. तातडीने रात्रीची सिंगल फेज वीजलाइन सुरू करावी, अर्थिंगची योग्य देखभाल करावी व अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी