
सोलापूर, 15 एप्रिल (हिं.स.)। आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात माणूस यश, आनंद आणि समाधानाच्या शोधात सतत धावत असतो; मात्र या शर्यतीत “मी कोण आहे?” हा मूलभूत प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. जीवनाची खरी दिशा याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेली असल्याचे प्रतिपादन परमपूज्य मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांनी आपल्या प्रेरणादायी अमृतवाणीतून व्यक्त केले.
स्वर्गीय भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वालचंद शिक्षण समूहाच्या वतीने डब्ल्यू.आय.टी. जैन टेम्पल येथे आयोजित ग्रीष्मकालीन वाचन कार्यक्रमात ते प्रबोधनपर विचार मांडत होते. जैन तत्त्वज्ञानातील आत्मओळखीची संकल्पना ही केवळ तात्त्विक नसून जीवनाला दिशा देणारी प्रक्रिया आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भीती, तुलना आणि “लोक काय म्हणतील?” या विचारांच्या ओझ्याखाली माणूस स्वतःची खरी ओळख हरवतो. आत्मा स्वतंत्र, शक्तिशाली आणि अनंत गुणांनी युक्त आहे, ही जाणीव आत्मविश्वास निर्माण करते, असे त्यांनी सांगितले.
याच संदर्भात आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचा “कोऽहं? कति गुणाः? किम् मम सामर्थ्यम्?” हा मंत्र आत्मचिंतनाचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
गरुड आणि कोंबडीची कथा तसेच भिकाऱ्याच्या सुवर्णकथेच्या माध्यमातून त्यांनी आत्मज्ञानाच्या अभावामुळे माणूस स्वतःच्या क्षमतेपासून कसा दूर राहतो, हे प्रभावीपणे स्पष्ट केले.
दररोज आत्मचिंतन, स्वतःचे निरीक्षण आणि ध्येयाशी प्रामाणिक राहणे आवश्यक असल्याचा संदेश देत त्यांनी तरुणांना आवड आणि ध्येय यातील फरक समजून घेण्याचे आवाहन केले.
“स्वतःला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या अनंत क्षमतेला जागृत करा,” असे सांगत त्यांनी जीवन अधिक अर्थपूर्ण व सुंदर करण्याचा मूलमंत्र दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड