
नाशिक, 15 एप्रिल (हिं.स.)। एकीकडे संपूर्ण शहरात डॉ. आंबेडकर जयंती साजरी होत असताना आणि मिरवणुकीत मग्न असताना, दुसरीकडे येवल्यात रक्ताचा थरार पाहायला मिळाला. शहरातील शनी पटांगण परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाचा सिमेंटच्या दगडाने निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव एकनाथ बाळकृष्ण गायकवाड (वय ३८, रा. सुरेगाव) असे आहे. शनी पटांगण परिसरात गायकवाड उभे असताना अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा जड दगड घालून त्यांना जीवे मारले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाची माहिती येवला शहर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी एकनाथला तत्काळ येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि रक्त स्राव अधिक झाल्याने, प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले होते. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत बोलताना येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश घोरपडेयांनी सांगितले की, सध्या याप्रकरणी अकरमात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. हा हल्ला नक्की कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याचा तपास पोलीस गांभीर्याने करत असून लवकरच आरोपीला गजाआड केले जाईल.
जयंती उत्सवाच्या रात्रीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुण कोणासोबत आला होता आणि वाद नेमका कशामुळे झाला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV