परतवाडा प्रकरणी 6 पोलिसांची तात्काळ बदली
अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद (अ
परतवाडा प्रकरणात पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये; सहा जणांची तात्काळ बदली


अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद (अमरावती ग्रामीण) यांनी सखोल व निष्पक्ष तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

या पथकाच्या माध्यमातून प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी आणि पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तपास प्रक्रियेदरम्यान कोणताही दबाव, हस्तक्षेप किंवा स्थानिक पातळीवरून तपासावर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार परतवाडा आणि अचलपूर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व अंमलदारांना तात्काळ प्रभावाने त्यांच्या मूळ ठिकाणाहून दूर करून नियंत्रण कक्ष, अमरावती ग्रामीण येथे तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्यात आले आहे. यामध्ये परतवाडा पोलीस ठाण्याचे API सलीम शेख, हेड कॉन्स्टेबल अब्दुल नाझीम अब्दुल कलीम (बकल नं. 417), पोलीस शिपाई शुभम दिलीप वर्मा (बकल नं. 767) आणि मयूर सदानंद राव गुरव (बकल नं. 190) तसेच अचलपूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मोहन धनराज वावरे (बकल नं. 1969) आणि पुरुषोत्तम मधुकर बावनेर (बकल नं. 1489) यांचा समावेश आहे.

या निर्णयामागे तपासात पूर्ण निष्पक्षता राखणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय पक्षांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे.

पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले असून SIT मार्फत पुरावे गोळा करणे, संबंधितांची चौकशी करणे आणि गुन्ह्याच्या मूळापर्यंत पोहोचणे यावर भर दिला जाणार आहे. पुढील तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande