
सोलापूर, 15 एप्रिल, (हिं.स.) सोलापूरकरांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे. पुणे विमानतळाच्या उन्हाळी हंगामात सोलापूरसाठी नवीन स्लॉट मंजूर झाले असून, येत्या १ मे २०२६ पासून सोलापूर ते पुणे विमानसेवा अधिकृतपणे सुरू होत आहे. विशेष म्हणजे, या विमानसेवेमुळे सोलापूर ते पुणे हे अंतर आता अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
पुण्याहून पहिल्यांदाच सोलापूरसाठी हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध होत असून, अशा प्रकारे थेट पुण्याशी जोडले जाणारे सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे.
विमानसेवेचे सविस्तर वेळापत्रक:
स्टार एअर (Star Air) कंपनीतर्फे ही सेवा आठवड्यातील सातही दिवस पुरवण्यात येणार आहे.
सोलापूरहून पुण्याला जाणारे विमान दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. त्यानंतर थोड्याच वेळाच्या अंतराने पुण्याहून दिल्ली, लखनौ, डेहराडून, बेंगळुरू, कोलकाता, चेन्नई आणि अगदी दुबईसाठी देखील उड्डाणे उपलब्ध आहेत. त्यामुळे 'कनेक्टिंग फ्लाईट'च्या माध्यमातून सोलापूरकर आता पुण्यावरून देशाच्या आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सहज प्रवास करू शकतील.
प्रवास वेळेत मोठी बचत: रस्ते मार्गे लागणारे ६ ते ७ तास आता केवळ ४०-४५ मिनिटांवर येणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शहर: पुण्याशी हवाई मार्गाने जोडले जाणारे सोलापूर हे पहिले शहर ठरले आहे.
विमानतळ क्षमता वाढली: पुणे विमानतळावर १५ अतिरिक्त स्लॉट मंजूर झाल्यामुळे आता दररोजच्या उड्डाणांची संख्या २३५ झाली आहे.
या नवीन विमानसेवेमुळे सोलापूरच्या व्यापार, उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्राला मोठी गती मिळणार असून प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड