
रायगड, 15 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक खूनप्रकरण उघडकीस आले असून, संशयातून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही भीषण घटना पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास मौजे महालोर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बिरवाडकर यांच्या आंब्याच्या बागेत असलेल्या लाकडी झोपडीजवळ फिर्यादीच्या महिलेवर तिच्याच पतीने जीवघेणा हल्ला केला.
आरोपी हा नवी आदिवासीवाडी, पो. शिघरे येथील रहिवासी असून, संशयाच्या भरात त्याने कोयता आणि लाकडी दांडक्याने महिलेवर वार केले. या अमानुष मारहाणीत महिलेचे दोन्ही हात व पाय मोडले गेले आणि ती गंभीर जखमी झाली. या क्रूर हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुरुड पोलीस ठाण्याने तात्काळ तपास सुरू करत आरोपीला तत्काळ अटक केली.
या घटनेप्रकरणी गुन्हा क्रमांक 65/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)