विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर, १२ मे रोजी मतदान
- डाॅ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेवरही होणार मुंबई, 16 एप्रिल (हिं.स.) - आगामी मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवार, १२ मे २०२६ रोजी मतदान होणार असून
विधान भवन मुंबई


- डाॅ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेवरही होणार

मुंबई, 16 एप्रिल (हिं.स.) - आगामी मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवार, १२ मे २०२६ रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल लागणार आहे. सोबतच काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर देखील निवडणूक होणार आहे.

रिक्त / निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शप गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अप गट), गोपीचंद पडळकर (भाजप), रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप), राजेश राठोड (काँग्रेस), प्रवीण दटके (भाजप) आणि रमेश कराड (भाजप), अशा 9 जणांचा समावेश आहे. या जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम

१. निवडणुकीची अधिसूचना जारी करणे - २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)

२. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)

३. उमेदवारी अर्जांची छाननी २ मे, २०२६ (शनिवार)

४. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ४ मे, २०२६ (सोमवार)

५. मतदानाचा दिनांक १२ मे, २०२६ (मंगळवार)

६. मतदानाची वेळ सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० पर्यंत

७. मतमोजणी (निकाल) १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ५:०० वाजता

८. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक १३ मे, २०२६ (बुधवार)

विधानसभेतील सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, भाजपला ५ जागा जाण्याची शक्यता आहे, तर शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि मविआ १ जागा जिंकू शकते. मात्र, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मते असल्याने आणि महायुतीने अधिक उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर असून, चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. सोबतच काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या आमदारकीची मुदत २७ जुलै २०३० पर्यंत आहे. या रिक्त जागेवरील पोटनिवडणूकही निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande