लोकसभेत आदित्य ठाकरेंच्या मुद्यावरून गदारोळ : उबाठा आणि भाजप खासदार आमने-सामने
नवी दिल्ली, 16 एप्रिल (हिं.स.) - नारी शक्ती वंदन विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. चर्चेदरम्यान भाजप विरुद्ध शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (शप) यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
अरविंद सावंत निशिकांत दुबे


नवी दिल्ली, 16 एप्रिल (हिं.स.) - नारी शक्ती वंदन विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. चर्चेदरम्यान भाजप विरुद्ध शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (शप) यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाजपाकडून महिलांचा सन्मान केला जातो का, असे म्हणत शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी बलात्कार प्रकरणातील कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी तर अभिनेत्रीची हत्या केली आहे. त्यांच्या या विधानावर खा. अरविंद सावंत आणि खा. सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला.

विधेयकावर बोलत असताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, दिल्लीत कार्यक्रम झाला. आमच्या एका हुशार आयएएस अधिकाऱ्याने त्यात एक लेख लिहिला. यांचे (भाजप) सरकार महाराष्ट्रात आहे. त्या महिला अधिकाऱ्याने लिहिले की, सरकारमधील एका मंत्र्यांने सांगितले की, मला महिला अधिकारी नको. हे महिला अधिकाऱ्यांच्या सन्मानाची, अधिकाराची आणि सुरक्षेच्या चर्चा करतात? कुलदीप सेंगर कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे? हे विसरू नका. ब्रिजभूषण शरण सिंह कोणत्या पक्षाचा आहे? हे महिलांच्या सन्मानाची गोष्ट करतात, असे अरविंद सावंत म्हणाले. बलात्कारी तुम्हाला खूप प्रिय आहेत का?, असा प्रश्नही विचारला.

त्यावर निशिकांत दुबे यांनी आक्षेप घेत बोलण्याची परवानगी मागितली. त्यावर तालिकाध्यक्षांनी खासदार निशिकांत दुबेंना बोलण्याची संधी दिली. निशिकांत दुबे म्हणाले, जर हे कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबद्दल बोलणार असतील, तर आदित्य ठाकरेंबद्दलही बोललं जाईल. त्यांनीही अभिनेत्रीला मारले आहे. इथेच चर्चा करुयात. दुबे यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटासह विरोधी बाकांवरील अन्य खासदार आक्रमक झाले आणि सभागृहात काही काळ गोंधळ उडाला.

अरविंद सावंत आणि विरोधकांनी दुबेंवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर तालिकाध्यक्ष म्हणाले, ते जे बोलले आहेत. ते कामकाजातून वगळण्यात आले आहे. ते जे काही बोलतील ते कामकाजात घेतले जाणार नाही.

त्यानंतर अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे आग्रही मागणी केली की, दुबे यांनी माफी मागितली पाहिजे. त्यानंतर बराच वेळ गोंधळ सुरू राहिला. तालिकाध्यक्षांनी उभे राहून सदस्यांना शांतता राखण्यास सांगून सावंतांना बोलू द्या असे म्हणाले. त्यानंतर सावंत म्हणाले की, कुणाला बदनाम करायचे असेल, तर मी तडीपारचं नाव घेऊ का? कोण तडीपार होतं. एपस्टिन फाइल्सचं नाव घेऊ का? बोला ना, मला तोंड उघडायला लावू नका, असे सावंत म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande