
रांची, 16 एप्रिल (हिं.स.)। झारखंडमधील अतिनक्षलप्रभावित सारंडा जंगल परिसरात सुरक्षा दलांवर मोठा हल्ला झाला आहे. मनोहरपूर प्रखंडातील छोटानागरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालिबा गावाजवळील चडराडेरा येथे नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटात पाच जवान जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात सर्च ऑपरेशन दरम्यान चकमक झाली. याच वेळी नक्षलवाद्यांनी आधीच पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात कोब्रा बटालियन 205 चे निरीक्षक सत्य प्रकाश गंभीर जखमी झाले, तर अन्य चार जवान चकमकीदरम्यान गोळी लागून जखमी झाले आहेत.
या घटनेची पुष्टी चाईबासा येथील पोलिस अधीक्षक अमित रेणू यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, हा हल्ला नक्षलवाद्यांच्या सुनियोजित कटाचा भाग असल्याचे दिसते. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम तीव्र केली असून अतिरिक्त दलांची तैनाती करण्यात आली आहे.
जखमी जवानांना तात्काळ एअर लिफ्ट करून रांची येथे नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी जवानांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतरांवर स्थानिक स्तरावर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व जखमींच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून परिसरात व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे, जेणेकरून नक्षलवाद्यांचे मनसुबे हाणून पाडता येतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode