

* वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती
वर्धा, 16 एप्रिल (हिं.स.) - भारताचा आत्मा भारतीय भाषांमधूनच व्यक्त होतो. विविध भारतीय भाषांमधून संस्कृती, संवेदनशीलता आणि चेतनेचा एकच प्रवाह वाहत असतो, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आज त्यांच्या उपस्थितीत, सहावा दीक्षांत समारंभ झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. ईशान्य भागातील विद्यार्थ्यांसह देशभरातील विविध राज्यांमधील विद्यार्थी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत हे पाहून आपल्याला आनंद झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आंतरभाषिक संवादाची ही परंपरा हिंदीसह सर्व भारतीय भाषांच्या प्रगतीस हातभार लावेल असेही त्यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्याचा सल्ला दिला. राष्ट्राविषयीच्या अभिमानाच्या भावनेसह, दोन राष्ट्रीय उद्दिष्टांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे सांगत, ही उद्दिष्टे भारतीयत्वशी जोडलेली आहेत , आपल्या राष्ट्रीय अस्मितेशी जोडलेली आहेत आणि आपल्या देशबांधवांची, विशेषतः युवकांची प्रतिभा व आत्मविश्वास यांच्याशी अविभाज्यपणे जोडलेली आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. ती उद्दिष्टे म्हणजे वसाहतवादी मानसिकतेचा मागमूस नष्ट करणे आणि भारतीय ज्ञान परंपरेची पुनर्स्थापना करणे. त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही भाषेला विरोध न करण्याचा परंतु भारतीय भाषांचा अभिमान बाळगण्याचा सल्ला दिला.
या विद्यापीठाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव देणे हे सर्वार्थाने उचित आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या विद्यापीठाशी संबंधित असलेले सर्वजण, हिंदी आणि इतर भारतीय भाषांच्या संवर्धन आणि विकासासाठी दृढ निश्चयाने काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बापूंच्या आदर्शांचे पालन करून, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाशी निगडित तुम्ही सर्वजण विद्यापीठाचा गौरव निरंतर वाढवाल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गांधीजींनी शिक्षणाला स्वावलंबनाचा पाया मानले. गांधीजींच्या म्हणण्यानुसार केवळ बहुसंख्य नागरिकांच्या जीवनावश्यक गरजांशी जोडलेले शिक्षणच अर्थपूर्ण शिक्षण म्हणता येईल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. राष्ट्रीय हित साध्य न करणाऱ्या शिक्षणाला गांधीजींनी ‘अराष्ट्रीय शिक्षण’ असे संबोधले आणि अशा शिक्षणावर त्यांनी टीका केली होती. लोकांच्या भावना समजून घेण्याची, सर्वसामान्यांच्या जीवनांमध्ये रस घेण्याची आणि त्यांच्या वतीने बाजू मांडण्याची क्षमता हा अर्थपूर्ण शिक्षणाचा एक अविभाज्य भाग आहे असे गांधीजी मानत असत. गांधीजींचे शिक्षणाच्या बाबतीत असलेले विचार सुमारे 100 वर्षांपूर्वी जितके उपयुक्त होते तितकेच ते आजही प्रासंगिक ठरत आहेत यावर राष्ट्रपतींनी अधिक भर दिला.
केवळ आपली मातृभाषाच, सर्जनाची, अन्वेषण, अभिव्यक्ती तसेच नवोन्मेषाची भाषा म्हणून कार्य करू शकते, असे विचार मांडत, आपण केवळ नक्कल न करता अस्सल कार्याची निर्मिती केली पाहिजे. आपल्याला सशक्त, आत्मनिर्भर आणि विकसित भारताची उभारणी करायची आहे. अशा भारताची प्रत्यक्षात उभारणी करणे केवळ भारतीय भाषांच्या भक्कम पायावरच शक्य आहे. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणा’सह विविध उपक्रमांच्या जोरावर आपला देश, अशाच योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे असे त्या म्हणाल्या. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील युवा विद्यार्थी वैयक्तिक विकास तर साध्य करतीलच, पण त्याचबरोबर राष्ट्र उभारणीमध्ये लक्षणीय योगदान देऊन जागतिक व्यासपीठावर भारताची शान वाढवतील असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी