
नाशिकमधील धर्मांतरण व लैंगिक शोषणाचे प्रकरण
नाशिक,16 एप्रिल (हिं.स.) : टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक शाखेत एचआर-मॅनेजर असलेल्या निदा खानच्या जिहादी ष़डयंत्राचा खुलासा झाल्यापासून तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी 9 एफआयआर दाखल करून 8 जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. परंतु, या घटनेची मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
नाशिकच्या सामान्य मुस्लिम कुटुंबातील निदा खान टीसीएस कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. या प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून निदा फरार असून पोलिसांची 3 पथके तिच्या मागावर आहेत. परंतु, निदाचा ठाव ठिकाणा अजून लागलेला नाही. टीसीएसमध्ये काम करणाऱ्या हिंदू तरुणींचा मानसिक छळ, लैंगिक अत्याचार करवण्याचा मुख्य हेतू धर्मांतरण असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. उत्तर प्रदेशातील छांगुर बाबा केस प्रमाणेच नाशिकच्या प्रकरणात देखील आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच स्थानिक पोलिस आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) मदत घेत आहेत.
निदाच्या अटकेविना खुलासा अशक्य
निदाच्या संदर्भात पोलिस रेकॉर्डवर उपलब्ध माहितीनुसार निदाचे पूर्ण नाव निदा एजाज खान असून ते अवघी 26 वर्षांची आहे. टीसीएस कंपनीत ती 2021 पासून काम करत होती. नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खानचे माहेर असून तिचा पती एका खसगी कंपनीत कामाला आहे. टीसीएसमधील मुस्लिम तरुणांच्या प्रेमात हिंदू तरुणींना अडकवण्यात निदाची मुख्य भूमिका होती. त्यासाठी निदा आरोपींनी सर्वतोपरी मदत करायची. टीसीएसमधील आरोपी मुस्लिम तरुणांच्या विरोधात आतापर्यंत 78 तक्रारी आल्या होत्या. परंतु, एचआर मॅनेजर असलेल्या निदाने या सर्व तक्रारींवर आजतागायत काहीच कारवाई केली नाही. निदाचे आंतरराष्ट्रीय धर्मांतर टोळीशी संबंध असण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस याप्रकरणी एनआयए आणि इतर केंद्रीय एजन्सीजची मदत घेत आहेत.
टीसीएस व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष
यासंदर्भात टीसीएसमध्ये कार्यरत एका कर्मचाऱ्याने सांगितले की, नाशिक प्रकरणात निदा खान मास्टर माईंड असली तरी तिचे खरे सूत्रधार कंपनीतच इतरत्र आहेत. अन्यथा एका ब्रांच एचआरला इतके अमर्यादित अधिकार मिळू शकत नाहीत. तसेच या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी नाशिकमधील टीसीएसच्या 150 कर्मचाऱ्यांना 13 एप्रिलपासून घरून ऑनलाईन काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला नाशिकमध्ये पाहणी करणार आहे. त्यापूर्वी घडलेल्या प्रकारावर पांघरूण टाकण्याचा टीसीएस व्यवस्थापनाचा हेतू असल्याचा खळबळजनक दावा कंपनीतील कर्मचारी करीत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनी नाशिकमध्ये घडलेल्या घटनेसाठी टीसीएसच्या टॉप मॅनेजमेंटच्या अक्षम्य दुर्लक्षाला जबाबदार धरले आहे.
अधिकृत माहितीची प्रतीक्षा
निदा एजाज खान फरार झाल्यापासून तिच्या संदर्भात 3 प्रमुख गोष्टीं स्थानिक टीसीएस वर्तुळात चर्चेत आल्या आहेत. 1) निदाची पाठराखण टीसीच्या टॉप मॅनेजमेंटमधील कुणीतरी करीत होते. 2) निदाचे पीएफआयशी कनेक्शन असून तिचे आंतरराष्ट्रीय धर्मांतरण रॅकेटशी संबंध आहेत.
3) निदाला पीएफआयची मदत मिळत असून ती केरळला फरार झाली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सध्या 3 पथके निदाचा शोध घेत आहेत. तिला अटक झाल्यानंतरच याबाबत अधिकृत खुलासा होऊ शकले. तुर्तास तपास सुरू असून तपासादरम्यान पुढे येणाऱ्या अर्धवट माहितीवर कुठलेही अधिकृत वक्तव्य करणे योग्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी