
नवी दिल्ली, 16 एप्रिल (हिं.स.)। ज्या हातांनी पाळणा हलवला, तेच हात आज देशाच्या सीमा सुरक्षित राखत आहेत आणि तेच हात आज सर्वोच्च सभागृहात कायद्याची निर्मिती करणार आहेत. ‘नारी शक्ती वंदन' हे विधेयक त्या अदृश्य हातांना दृश्य ताकद देण्याचे कार्य करुन देशाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावेल, अशी भूमिका खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत मांडत ‘नारी शक्ती वंदन' विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा व्यक्त केला.
‘नारी शक्ती वंदन' विधेयकावर आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकावर शिवसेना पक्षाची भूमिका मांडली.
खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, ज्ञानाची देवी सरस्वती आहे तर शौर्याचे प्रतिक माँ दुर्गा आहे. अहिल्याबाई होळकरांनी एक उत्तम शासक म्हणून राज्य कारभार चालविला. आज महिला ग्रामसेविकेपासून सरपंच पदापर्यंत आपल्या गावचा कारभार हाकात असून पूर्ण गावाचा कायापालट त्यांनी केला आहे. आज देशाच्या सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मू विराजमान असून ती अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाचा फक्त नारा नसून एक ध्येय्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
महाराष्ट्रात तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहिण योजना सुरु झाली. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने ते क्रांतिकारी पाऊल होते. ती केवळ आर्थिक मदत नसून माता-भगिनींच्या स्वाभिमानाचा सन्मान होता. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्धर करुन मुख्य प्रवाहात आणले गेले. आज या विधेयकामुळे महिलांचा संसदेत आज गुंजणार असून देशाची प्रगतीकडे वाटचाल अजून मजबूत होईल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या ऐतिहासिक विधेयकाला एकमताने पाठिंबा देण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना आवाहन करत हे विधेयक एका पक्षाचे नसून या देशाच्या 'मातृशक्तीचे' प्रतिक आहे. आपल्या समर्थनामुळे जगाला हा संदेश जाईल की, भारत आपल्या मुलींच्या पंखांना आकाश देण्यास सज्ज आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर