
बेरूत, 17 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि लेबनान यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतर बेरूतसह अनेक भागांत शांततेचे वातावरण दिसून येत आहे. दोन्ही देश सध्या १० दिवसांच्या संघर्षविरामावर सहमत झाले आहेत. हा युद्धविराम केवळ १० दिवसांचा असला तरी त्यामुळे हजारो विस्थापितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सध्याची परिस्थिती अशी आहे की, मोठ्या संख्येने विस्थापित कुटुंबांनी घरवापसीचा प्रवास सुरू केला आहे. शुक्रवारी सकाळी दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. या वाहनांच्या रांगा लिटानी नदीवरील नुकसानग्रस्त कासमियेह पुलापर्यंत पोहोचल्या होत्या. हा पूल दक्षिणेकडील किनारी शहर टायरला उत्तरेकडील भागाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.घरगुती सामानाने भरलेली वाहने हळूहळू पुढे जाताना दिसत होती. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धामुळे लेबनानमध्ये १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले होते.
लेबनानी अधिकाऱ्यांनी इशारा दिला होता की, युद्धविराम लागू झाल्यानंतर लगेच नागरिकांनी आपल्या घरी परतण्याचा प्रयत्न करू नये. मात्र अधिकाऱ्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून संघर्षविराम जाहीर झाल्यानंतर काही तासांतच मोठ्या संख्येने लोक दक्षिण लेबनानकडे रवाना झाले.अनेक लोक जेव्हा आपल्या घरांपर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांना उद्ध्वस्त झालेल्या इमारती, तुटलेले रस्ते आणि लोंबकळणाऱ्या विद्युत तारा दिसून आल्या.
बेरूतच्या दक्षिणेकडील हारेत हरेक परिसरात इस्रायली हल्ल्यांनंतर संपूर्ण इमारतींचे ढिगारे झाले आहेत. अशा परिस्थितीतही ४८ वर्षीय अहमद लहम हे मलब्याच्या ढिगाऱ्यावर उभे राहून हिजबुल्लाचा पिवळा झेंडा फडकावत होते. हा ढिगारा पूर्वी त्यांच्या अपार्टमेंट इमारतीचा भाग होता. त्यांनी इराणचे कौतुक करत म्हटले की, अमेरिकेसोबतच्या चर्चेत इराणच्या दबावामुळेच हा संघर्षविराम शक्य झाला. तसेच लेबनानने इस्रायलशी थेट चर्चा केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “फक्त इराणीच आमच्या पाठीशी उभे राहिले, इतर कोणी नाही.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode