
बीड, 21 एप्रिल (हिं.स.)। मोहा-सिरसाळा आणि परळी नागापूर या रस्त्यांच्या तातडीने अद्ययावतीकरणासाठी कान्नापूर येथे सुरू असलेले डीवायएफआय संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्वामी आणि उपअभियंता मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. येत्या दहा दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुरवात करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हा निर्णय घेण्यात आला.
अतिवृष्टीमुळे या मार्गांची अक्षरशः चाळणी झाली असून, पूलही खचले आहेत. आरोग्य, शिक्षण आणि व्यापारासाठी हजारो नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कार्यारंभ आदेश मिळूनही काम सुरू होत नसल्याने संताप व्यक्त होत होता. चर्चेदरम्यान, सिरसाळा-मोहा रस्त्याचे काम आठ दिवसांत सुरू करण्याचे आणि परळी-नागापूर मार्गाची निविदा पुन्हा प्रकाशित करण्याचे मान्य करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis