
ठाणे, 23 एप्रिल (हिं.स.)।
साडेबारा हजार कोटी रुपये खर्चून ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची ठाणेकरांना गरज आहे का? अंतर्गत मेट्रोवर बारा हजार कोटी खर्च करण्यापेक्षा एक हजार कोटी खर्च करून जर टीएमटी सक्षम केली तर ठाणेकर सत्ताधाऱ्यांना दुवा देतील. आधीच मेट्रोमुळे शहरातील रस्ते नामशेष होऊ लागले आहेत, त्यात हा नवा घाट का घातला जातोय. या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले..
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अंतर्गत रिंग रेल्वे प्रकल्प बॅरिस्टर नाथ पै मार्ग, हिरानंदानी इस्टेट आणि बाळकूम मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. सुमारे साडेबारा हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. मात्र, ठाणेकरांना खरोखर या प्रकल्पाची गरज आहे का, हा मोठा प्रश्न आहे. या निधीपैकी एक हजार कोटी परिवहन व्यवस्थेसाठी देऊन इलेक्ट्रिक बस खरेदी केली तर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. आपण दररोज स्वतः बॅरिस्टर नाथ पै मार्ग वरून प्रवास करतो. त्या रस्त्यावरून घरी पोहोचण्यासाठी आपणाला किमान तीन सिग्नल पार करावे लागतात, इतकी वाहतूक कोंडी असते. या प्रकल्पानंतर ही कोंडी अधिकच वाढणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी 37% कर्ज घेण्यात येणार आहे. आधीच सरकारकडे पैसे नाहीत; आता, हे नवीन कर्ज फेडणार कुठून आणि 63% रक्कम आणणार कुठून? दुसरीकडे कारशेडसाठी 44 एकर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. ही जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे शेतकरी ठाणेकरच आहेत. त्यांना भूमिहीन करून कसला विकास साधणार आहात, असा सवालही प्रधान यांनी केला आहे.
दरम्यान, आनंदनगर ते साकेत दरम्यान रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तसेच, रिंग रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे तीन हजार झाडे तोडण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. ज्या कारणांसाठी आपण ठाण्यात राहायला आलो, चांगली हवा आणि हिरवळ, तेच घटक आता धोक्यात आले आहेत. त्यामुळे माझा या रिंग रेल्वे प्रकल्पाला ठाम विरोध आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत ठाणेकर नागरिक रस्त्यावर उतरत नाहीत, तोपर्यंत अशा हजारो कोटी रुपयांच्या योजना सुरूच राहतील आणि आपण काहीही करू शकणार नाही. तसेच विदूषकाला निवडून दिलं, तर सर्कसच पाहायला मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर