
जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांना अधिक सुलभ, सुरक्षित व पारदर्शक सेवा देण्यासाठी “अण्णासाहेब पाटील महामंडळ अॅप” हे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, महामंडळाच्या विविध योजनांची संपूर्ण प्रक्रिया आता थेट मोबाईलवर करता येणार आहे.
महामंडळाच्या योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित असून, संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. मात्र, यासाठी संगणक किंवा सायबर कॅफेचा वापर करावा लागत असल्याने अनेक लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये मध्यस्थांमार्फत फसवणुकीच्या घटना घडल्यामुळे वेळ व खर्च वाढत होता. या पार्श्वभूमीवर ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांशी करार करून सेवा प्रति रु. ८५ दराने उपलब्ध करून देण्यात आल्या.
आता नव्याने विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅपमुळे लाभार्थ्यांना नोंदणी, अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची स्थिती तपासणे तसेच अद्ययावत माहिती मिळवणे या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन वापरकर्त्यांना मोबाईल क्रमांक, नाव व ई-मेलद्वारे ओटीपी पडताळणी करून नोंदणी करता येणार आहे, तर पूर्वी नोंदणीकृत लाभार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून पुढील प्रक्रिया सुरू ठेवता येईल.
महामंडळाच्या योजनांमध्ये इच्छापत्र (LOI), मंजुरी (Sanction) आणि अनुदान मागणी (Claim) असे तीन प्रमुख टप्पे असून, सर्व आवश्यक कागदपत्रे अॅपद्वारे अपलोड करता येतात. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक झाली असून लाभार्थ्यांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
तसेच, अनुदान मागणी सादर करणाऱ्या व नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी व्यवसायाचे जिओ-टॅग असलेले छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या छायाचित्रांची पडताळणी जिल्हा समन्वयकांमार्फत केली जाणार असून, व्यवसाय प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री होईल. यासाठी जिओ-टॅगिंग व जिओ-फेन्सिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, गुगल नकाशाच्या साह्याने व्यवसाय पाहणीचे नियोजन केले जाणार आहे. ही माहिती पुढे महामंडळाच्या EHRMS प्रणालीशी संलग्न केली जाणार आहे.
संगणक प्रणालीवरील सर्व सुविधा आता मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांनी हे अॅप डाउनलोड करून वापर करावा व या डिजिटल उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर