
जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत सर्वासामान्य जनतेस सकस व सुरक्षित, निर्भेळ व योग्य माहिती असलेले अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे बंधनकारक असून रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांनी अन्नपदार्थ तयार करताना वापरण्यात येणाऱ्या “चीज अॅनालॉग” बाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या तरतुदीनुसार अन्नपदार्थ विक्री करताना ग्राहकांना त्यातील घटकांची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच लेबलिंग व डिस्प्ले नियम, २०२० नुसार मेनूकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड व बिलावर “चीज अॅनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
रेस्टॉरंट, हॉटेल्स, केटरर्स व फास्ट फूड विक्रेत्यांनी अन्नपदार्थ तयार करताना चीज अॅनालॉगचा वापर केल्यास त्याची स्पष्ट नोंद मेनूकार्ड व बिलावर करावी, अन्यथा संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
तसेच अन्न व्यवसायिकांनी परवाना घेताना दिलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवणे आवश्यक असून चुकीची माहिती दिल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
ग्राहकांनी पनीर खरेदी करताना लेबल तपासावे, संशय असल्यास बिल घ्यावे तसेच हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पनीर व चीज अॅनालॉग यामधील फरक लक्षात घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्राहकांची दिशाभूल झाल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त श्री. श्रीधर डुबे-पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर