
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)।मानवत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील रिंगरोड बायपासवरील उड्डाणपुलावरून मालवाहू ट्रक कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २१ एप्रिल) घडली. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील दगडू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथून परभणीकडे हिरवी मिरची घेऊन जाणारा सहा चाकी ट्रक (क्रमांक MH 23 AU 4399) मानवत बायपासवरील उड्डाणपुलावरून खाली कोसळला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ट्रक पुलावरून खाली पडल्याने त्याचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते, पोलीस शिपाई अविनाश डंबाळे तसेच गृहसुरक्षा दलाचे जवान यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
अपघातातील जखमी चालकाचे नाव शेख तय्यब शेख महबूब (रा. बीड) असे असून, रुग्णवाहिकेद्वारे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे चालकाचे प्राण वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, ट्रकमधील मिरचीचा माल दुसऱ्या वाहनात हलविण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संबंधित उड्डाणपुलावर सुरक्षाकठडे नसल्यामुळेच अपघाताची तीव्रता वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis