
बीड, 21 एप्रिल, (हिं.स.)। बायपास रोडवर असलेल्या मंगलनाथ मंदिर परिसरात नवनिर्मित विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय उत्सवाचा प्रारंभ २९ एप्रिल बुधवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार असून, १ मे रोजी मुख्य सोहळा संपन्न होईल.
बुधवारी चित्त संकल्प, मंडप प्रवेश आणि जलाधिवास या विधींनी सोहळ्याला सुरवात होईल. गुरुवारी (ता. ३०) प्रातःपूजन, जलयात्रा, ग्रहहोम आणि सायंकाळी मंगलनाथ मंदिर ते हनुमान चौक अशी भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.
शुक्रवारी (ता. १) सोहळ्याच्या मुख्य दिवशी सकाळी विनायक पाठक व ब्रह्मवृंद यांच्या मंत्रोच्चारात मुख्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण पार पडेल. त्यानंतर पूर्णाहुती व मंगल आरती होऊन दुपारी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
या मंगलमय सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यजमान सुभाष सोळंके आणि मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आयोजित करण्यात आलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis