
नगरसेवकांविरोधात अहवाल मागविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशनाशिक, 21 एप्रिल (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेतील ठेकेदार वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठेकेदारांविरोधातील तक्रारी आणि महासभेतील चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नगरसेवकांची नावे आणि त्यांची भूमिका याबाबत सविस्तर अहवाल मागविल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच सर्व लोकप्रतिनिधींना ठेकेदारांना अनावश्यक त्रास न देण्याचे आणि कामकाजात अडथळा न आणण्याचे आवाहन केले होते.
मात्र, नुकत्याच झालेल्या महासभेत काही नगरसेवकांनी एका ठेकेदाराच्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली. यापूर्वी या ठेकेदाराने काही नगरसेवकांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचीही माहिती आहे. त्यानंतर प्रशासन आणि पोलिसांकडून संबंधित प्रकरणात चौकशी व समज देण्यात आल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर पुन्हा महासभेत हा विषय चर्चेत आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. याची माहिती थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये सक्रिय भूमिका घेतल्याचे समजते. त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना संबंधित नगरसेवकांची नावे आणि त्यांची बाजू स्पष्ट करणारा गुप्त अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हा अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर होणार असून त्यानंतर पुढील राजकीय आणि प्रशासकीय कारवाईबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे नाशिक महापालिकेतील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV